*सोलापूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादीच्या गटनेते पदासाठी अतुल मालक पवार यांचे वाढले वजन!*
*(राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात अतुल मालक पवार)*
*(तळागाळातील कामाचा माणूस अशी अतुल मालक पवार यांची सर्वसामान्यांमध्ये खास ओळख!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रशासकीय प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत गटनेता कोण? यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. गटनेते पदावर सांगोल्याचे लोकप्रतिनिधी अतुल पवार आणि मोहोळचे विजयराज डोंगरे या दोन्ही सदस्यांनी कायदेशीर दावा ठोकल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्य पद येणार आहे. या पदाच्या नियुक्तीमध्ये गटनेत्याची शिफारस कायदेशीररीत्या अत्यंत महत्त्वाची ठरते. गटनेता ज्या नावाची शिफारस करेल, त्यालाच स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार असल्याने सध्या गटनेतेपदाचा वाद ऐरणीवर आला आहे.
पक्षांतर्गत गणिताचा विचार करता, सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य विजयी झाले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील चार सदस्य हे आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठीशी असून माढा आणि करमाळा तालुक्यातील चार सदस्य माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. याशिवाय मोहोळ, सांगोला आणि माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य विजयी झाला आहे.
या समीकरणात सांगोल्याचे अतुल पवार यांची बाजू अधिक भक्कम मानली जात आहे. अतुल पवार हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असून, भागात एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे. पक्षाच्या हितासाठी तळागाळात काम करणारा ‘कामाचा माणूस’ अशी त्यांची जनमानसातील प्रतिमा असल्याने त्यांना गटनेतेपदाची संधी मिळावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. त्यांचे हेच प्रामाणिक कार्य आणि लोकसंग्रह त्यांच्या दाव्याला अधिक मजबूत करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
दुसरीकडे, मोहोळचे विजयराज डोंगरे यांनीही या पदावर हक्क सांगितला असून ते माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाचे मानले जातात. दोन्ही नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे आपले दावे सादर केल्यामुळे ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार जिल्हाधिकारी तौलनिक संख्याबळ आणि तांत्रिक बाजू विचारात घेऊन गटनेतेपदाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, स्वीकृत सदस्यपदासाठी स्वतः जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे देखील इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे गटनेतेपदाचा आणि स्वीकृत सदस्याचा हा तिढा स्थानिक पातळीवर सोलापुरात सुटणार, की यासाठी थेट ‘बारामती’तून आदेश येणार? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
त्यातच महायुतीमधील इतर मित्रपक्षांकडून अंतर्गत विरोधाचे सूर उमटत असल्याने राष्ट्रवादीची मोठी कसोटी लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय या आठवड्यात दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांची कायदेशीर छाननी करणार असून, गटनेता म्हणून कोणाला अधिकृत मान्यता मिळते, यावरच स्वीकृत सदस्याचे भवितव्य अवलंबून असेल!
