*दुष्काळाने पाणी तळाला नेले पण आपण माणुसकीचा झरा वाहता ठेवूया!*
( शिक्षण प्रसारक मंडळाचा धान्य वाटपाचा विधायक उपक्रम!)
————————–
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मंगळवेढा ही फक्त संतभूमी नव्हे तर संतांच्या विचाराची वारसा जपणारी भूमी.या भूमीने अनेक वेळा दुष्काळ पाहिला आणि श्री संत दामाजी पंतांच्या दातृत्वाची जाणीव ही पहिली.नवरात्र उत्सव आणि मंगळवेढा हे नव समीकरण उभा महाराष्ट्र पाहतो आहे या कालावधीमध्ये भक्तांच्या गर्दीचा उच्चांक मोडला तसं उन्हाने ही कमाल मर्यादा ओलांडत झळा मुक्या जनावरापर्यंत पोहोचवल्या.नवरात्र उत्सवामध्ये गरबा दांडियाची धमाल इंग्लिश स्कूल मैदानामध्ये रंगायची आणि त्याचे सर्व नियोजन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रा.तेजस्विनी कदम आत्मीयतेने करायच्या मोठ्या संख्येने स्त्रिया या गरब्याचा आनंद लुटायच्या याही वेळेस अनेक सहभागी गटांचे फोन सतत यायचे पाऊस पडेल आणि शेतकऱ्याच्या मनाची आणि मातीची भूक भागेल ही आस आपल्या सर्वांनाच लागलेली पण त्याने हुलकावणी दिली.
प्रा.तेजस्विनी कदम यांनी गरबा दांडिया यावरती होणाऱ्या खर्चास फाटा देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून कष्टकरी,कामकरी,हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना धान्याची मदत करू असे मनोमन ठरवले.शिक्षण प्रसारक मंडळ हे नेहमीच अशा संकट समयी मदतीचा हात पुढे करते.यंदा निसर्गाने जणू अधिकच क्रूर मन बाळगले आहे दिवस उजाडतो तोच आकाशातून बरसणाऱ्या निखाऱ्याची जाणीव करून देत आणि मावळतो तो एका उशासासह! पावसाची ओढी सृष्टीच्या आणि मानवी जीवनाच्या नाडीची गतिमंद होणारी एक गंभीर धोक्याची घंटा आहे दोन थेंब पाण्याने जशी कोरडी माती मोहरते तसेच मदतीच्या हाताने माणसाचे मन ही फुलून येते.बंधू-भगिनींनो मला वाटलेला विचार मी आपल्यासमोर ठेवला अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार तर आपला मायबाप म्हणून पाठीशी आहेच पण आपणही माणूस म्हणून एकमेका साहाय्य करू! अवघे धरू सुपंथ! ही अभंग पंक्ती कृतीत आणूया आणि माणुसकीचा झरा संतभूमीचा,दामाजीपंतांचा विचार वाहता ठेऊया. माता भगिनींनी यावेळेस आम्ही गरबा दांडियाचे आयोजन न करता धान्य वाटपाचा संकल्प हाती घेतला आहे. आई जगदंबे निसर्गाचे हे रुसणे संपव आणि तृष्णार्थ मनाला आणि मातीला तृप्त करणाऱ्या पर्जन्यधारा लवकरच बरसो हीच या क्षणाची एकमेव आर्त प्रार्थना..
उपप्राचार्या प्रा.तेजस्विनी सुजित कदम (संचालिका, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा)
