ऊस उत्पादकांना पहिली उचल ३६०० रुपये द्या!
(अन्यथा १६ नोव्हेंबरनंतर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात पहिली उचल प्रतिटन ३ हजार ६०० रुपये द्यावी, अशी मागणी पंढरपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
बैठकीत ऊसदर निश्चित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे देण्याची भूमिका मांडण्यात आली. त्यानुसार पहिली उचल प्रतिटन ३ हजार ६०० रुपये द्यावी. साखर कारखाना बंद झाल्यानंतर प्रतिटन आणखी १०० रुपये आणि पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी २०० रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच साखरेचा दर प्रतिकिलो ४५ रुपयांच्या पुढे राहिल्यास ७०:३० फॉर्म्युल्यानुसार ऊसदर जाहीर करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली. साखरेच्या दरवाढीचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळावा, हा या मागणीमागील उद्देश आहे.
दरम्यान, १५ नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदार आणि जिल्हा प्रशासनाने या मागण्यांवर तोडगा काढावा. अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पंढरपुरातील या बैठकीनंतर साखर कारखानदार आणि प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
