मंदिर समिती कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे भाविकाची हरवलेली पर्स सुखरूप परत!
(मंदिर कर्मचारी राकेश पाटकुलकर यांचे सर्वत्र होत आहे कौतुक!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
गोपाळपूर येथील श्री विष्णुपद मंदिरात दर्शनासाठी आलेल्या डोंबिवली, मुंबई येथील सौ. वैदही विश्वनाथ विचारे यांची पर्स मंदिर परिसरात राहून गेली होती. मंदिर समितीचे कर्मचारी श्री. राकेश पाटकुलकर यांच्या निदर्शनास सदर पर्स आल्यानंतर त्यांनी ती तातडीने सीसीटीव्ही कक्षात जमा केली.
पर्समध्ये अंदाजे ७ ते ८ तोळे सोन्याचे दागिने व १,३०० रुपये रोख रक्कम आढळून आली. याबाबत त्यांनी मा. व्यवस्थापक यांना माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संबंधित भाविकांची ओळख पटवून सदर पर्स त्यांना सुखरूप परत करण्यात आली. मंदिर कर्मचारी श्री. राकेश पाटकुलकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेचे मंदिर समिती स्तरावरून कौतुक होत आहे.
