विठ्ठल कारखान्याने फोडली ऊस उत्पादकांच्या कोंडी; जिल्ह्यात सर्वाधिक ३१०१ रुपये दर!
(आमदार अभिजीत पाटील यांचा सभासद शेतकऱ्यांना दिलासा!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कारखान्याचे चेअरमन तथा आमदार अभिजीत पाटील यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३१०१ रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ऊसदराच्या चर्चेला नवे वळण मिळाले असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनाची धार कमी होऊन आंदोलन संपुष्टात येणार का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
यंदाच्या गळीत हंगामात पहिली उचल किती द्यायची, यावरून सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष सुरू आहे. काही संघटनांनी ठराविक कारखान्यांना लक्ष्य करून आंदोलन सुरू केले असून, गेल्या चार दिवसांपासून काही ठिकाणी कारखान्यांचे गाळप बंद पाडण्यात येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ३१०१ रुपयांची पहिली उचल जाहीर करून ऊसदराच्या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी प्राध्यापक सावंत यांनी प्रतिटन ३१०१ रुपयांचा दर जाहीर केला होता. त्यानंतर माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३००० रुपये दर जाहीर केला. आता आमदार अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानेही प्रतिटन ३१०१ रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराच्या स्पर्धेत विठ्ठल कारखान्याने आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
*(शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कारखान्याची भूमिका!)*
गेल्या काही दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावर काही शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठराविक कारखान्यांना लक्ष्य करून गाळप बंद पाडण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप विठ्ठल कारखान्याच्या संचालकांनी केला होता. काही संघटना इतर कारखान्यांच्या सांगण्यावरून आंदोलन करत असल्याचा आरोपही संचालकांकडून करण्यात आला होता.
*शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वी अभिजीत पाटील यांची घोषणा!*
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, संस्थापक अध्यक्ष तथा सहकार क्षेत्राचे जाणकार खासदार शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येत असताना आमदार अभिजीत पाटील यांनी पहिल्या उचलीची घोषणा केली आहे. त्यामुळे या निर्णयाला राजकीय आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर असताना शरद पवार यांचा दौरा आणि त्यापूर्वी विठ्ठल कारखान्याने घेतलेला निर्णय यामुळे ऊसदराच्या चर्चेला अधिक महत्त्व आले आहे.
उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांची पहिल्या उचलबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच विठ्ठल कारखान्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
