
सोलापुरातील पुन्हा एक निष्ठावंत नेता शरद पवारांची साथ सोडणार!
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यात आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाध्यक्षपदावरून दूर करण्यात आल्यानंतर बोलावण्यात आलेल्या समर्थकांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला, त्यामुळे शरद पवारांना सोलापुरात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
बळीराम साठे हे शरद पवार यांचे अत्यंत निकटचे सहकारी म्हणून ओळखले जातात. साठे यांनीही आतापर्यंत पवारांना कधीही अंतर दिलेले नव्हते. जिल्ह्यातील मातब्बर मंडळी पक्ष सोडून गेल्यानंतर पक्ष अत्यंत अडचणीत असताना काका साठे यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. प्रतिकूल परिस्थितीत साठे हे पक्षनेतृत्वासोबत एकनिष्ठ राहिले होते.
पडत्या काळात पक्षासोबत राहिलेल्या बळीराम साठे यांना दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यांच्या जागी मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदावरून अपमानास्पद पद्धतीने हटविण्यात आल्यानंतर साठे समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यातूनच शनिवारी समर्थकांची बैठक घेण्याचा निर्णय झाला होता.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळ्यात आज झालेल्या बैठकीत पक्षाकडून बळीराम काका साठे यांना देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. खुद्द बळीराम साठे यांनीही पक्षाने घेतलेल्या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त केली. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायचा होता, तर पक्षाने विश्वासात घेऊन आम्हाला सांगितले असते तर आम्ही तो दिला असता. पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्याबाबत आमच्याशी चर्चा केली असतील तर आम्ही तो दिला असता. पदाला चिकटून बसणाऱ्यांमधला मी नाही.
दरम्यान, पक्षाच्या निर्णयाबद्दल काका साठे आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले. कार्यकर्त्यांनी तर पक्ष सोडण्याची ठाम भूमिका मांडली. इतर कुठल्या पक्षात जायचे, याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय पक्का आहे, असे समर्थकांनी उघडपणे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय काका साठे यांनी घ्यावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी मांडली आहे. आता काका साठे कोणत्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतात, याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.