
आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे: रणजीत शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे निवेदन- पत्राद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की,६ जुलै 25 रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी असून या निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लहान मोठ्या शेकडो दिंड्या व लाखो वारकरी पंढरपूरला येत असतात. शासनातर्फे वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्ते, पाणी, आरोग्य व इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंड्या मोठ्या असून या दोन्ही दिंड्यामध्ये किमान ५ ते ६ लाख वारकरी असतात. त्याचप्रमाणे जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, धुळे ,नाशिक ,अहिल्यानगर या खानदेश विभागातील तसेच नांदेड संभाजीनगर परभणी लातूर धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यातून लहान मोठ्या दिंड्यातून किमान ५ ते ६ लाख वारकरी पंढरपूरकडे येत असतात .या सर्व विभागातून येणाऱ्या दिंड्या चारी दिशेने जेव्हा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात तेव्हा वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनी धरणातून भीमा नदी व उजव्या कालव्यातून प्राधान्याने पाणी सोडण्यात येते. माळशिरस , पंढरपूर, मंगळवेढा सांगोला या तालुक्यातून उजनीचा १२२ किलोमीटर पर्यंत उजवा कालवा वाहतो. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांची या उजव्याकालव्यातील पाण्यामुळे चांगली सोय होते. माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तसेच पंढरपूर तालुक्याच्या पूर्व-दक्षिण भागातून उजनीचा डावा कालवा१२६ किलोमीटर पर्यंत वाहतो .या भागातूनही लहान मोठ्या दिंड्या सहित किमान ४ ते ५ लाख वारकरी पंढरपूरकडे येत असतात. यांचे साठी या भागातून वाहणारा डाव्या कालवा व त्याच्या उपशाखातून पाणी उपलब्ध असणे नितांत आवश्यक आहे अन्यथा वारकऱ्यांना आंघोळ, कपडे धुणे व इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होणे या परिसरात कठीण होऊन बसणार आहे.
पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे , सोलापूर जिल्हाधिकारी यांचे सहित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनपत्रात रणजीत शिंदे यांनी नमूद केले आहे की 14 मे पासून ते आज पर्यंत उजनी धरणाच्या परिक्षेत्रात (कॅचमेंट एरिया) व पुणे जिल्हा भीमाशंकरचे डोंगर मावळ भाग व लोणावळा पश्चिम परिसर या भागात सर्वत्र मे महिन्यातच मुसळधार व दमदार पाऊस झाल्यामुळे 13 मे 25 रोजी उजनी जलाशयाचा ‘मायनस’ – 23 % पर्यंत पोहोचलेला पाणीसाठा आज पर्यंत ‘प्लस’ + 38% पर्यंत होत आलेली आहे व पाण्याच्या टक्केवारीमध्ये दिवसेंनदिवस वाढच होत आहे. आषाढी यात्रेसाठी जलसंपदा विभागाने नदी व उजव्या कालव्यासहित डाव्या कालव्याच्या 126 किलोमीटर पर्यंत पाणी सोडणे वारकऱ्यांच्या सोयीसाठी अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून पाण्याअभावी वारकऱ्यांचे हाल व त्रास होणार नाही अशी रास्त अपेक्षा रणजीतसिंह शिंदे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.