आषाढी यात्रेसाठी महत्त्वाचा उड्डाणपूल लवकर पूर्ण करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विक्रम शिरसट यांचे निवेदन!
(काही राजकीय व सामाजिक कार्यकर्ते विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत जाणून बुजून करत आहेत:-विक्रम भैया शिरसट)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील मार्केट यार्ड ते भिंगे चौक दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपूलाचे काम कोणत्याही अडथळ्याविना लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी भाजपा चे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच आषाढी यात्रेदरम्यान वाखरी पालखी तळापासून पंढरपूरमध्ये येणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज व इतर मानाच्या पालख्यांना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी या उड्डाणपुलाची योजना राबविण्यात आली आहे. या कामासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या मार्केट यार्ड ते सरगम टॉकीजपर्यंत उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून इंदिरा गांधी चौक ते भिंगे चौक या भागातही काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, नवी पेठ परिसरातील काही नागरिकांनी नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसायासाठी खोकी टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे अतिक्रमण हटू नये म्हणून काही जण स्थानिक नागरिकांना हाताशी धरून उड्डाणपुलाच्या कामाला विरोध करत असल्याचेही शिरसट यांनी म्हटले आहे.
हा उड्डाणपूल अंदाजे ४ बाय ४ पिलरवर उभारला जाणार असून कोणतीही भिंत बांधण्यात येणार नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही किंवा जागाही बाधित होणार नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. उलट या पुलामुळे नवी पेठ परिसर, इंदिरा गांधी चौक तसेच सरगम टॉकीजजवळील रेल्वे पुलाखाली होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच विद्यार्थ्यांना, नागरिकांना आणि लाखो भाविकांना शहरातून इसबावी परिसरासह उपनगरांकडे जाणे-येणे अधिक सुलभ होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. काही राजकीय व सामाजिक कार्यकर्ते विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, अशा प्रवृत्तीवर वेळीच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

