*उज्जैन-इंदोर , मडगाव , देहूरोड , मुंबई अशा नव्याने रेल्वे गाड्या सुरू करा..: प्रणव परिचारक*
*(मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे प्रणव परिचारक यांची मागणी)*
*(पंढरपूरला गोवा, कर्नाटक , गुजरात राजस्थान, मध्यप्रदेशाला जोडणाऱ्या नव्या गाड्या परिचारक यांनी सुचवल्या)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
पंढरपूर शहरातील प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी तसेच भाविकांच्या सोयीसाठी विविध नवीन रेल्वे सेवा सुरू कराव्यात व काही महत्त्वाच्या गाड्यांचा विस्तार करण्यात यावा, यामध्ये पंढरपूर हे गोवा ,कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात अशा राज्यांसह मुंबई व पुणे ला दररोज जोडण्यासाठी नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे केली असल्याची माहिती भाजपने नेते प्रणव परिचारक यांनी दिली आहे.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव आणि मंडल रेल प्रबंधक सुजित मिश्रा यांनी आज पंढरपूरला भेट दिली. एवढी पंढरपूरला जोडणाऱ्या व नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या गाड्या संदर्भात दोन्ही मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. याबाबतचे निवेदन देखील प्रणव परिचारक यांच्याकडून देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे मा.सदस्य म्हणून अॅड. प्रणव परिचारक हे पंढरपूरच्या रेल्वे प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करत आहेत.
पंढरपूरच्या रेल्वे प्रश्नाबाबत प्रणव परिचारक यांनी केलेल्या मागण्यांमध्ये , पंढरपूर – पुणे – देहूरोड अथवा पनवेलपर्यंत नवीन दैनिक इंटरसिटी / एक्सप्रेस सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या रेल्वेगाडीतून पंढरपूरची पुण्याला दररोज कनेक्टिव्हिटी होईल.ही गाडी पंढरपूर, आळंदी आणि देहूरोड या धार्मिक स्थळांना जोडणारी ठरणार असून विद्यार्थी, नोकरी करणारे प्रवासी व भाविकांसाठी उपयुक्त ठरेल.
तसेच कोल्हापूर – सोलापूर – कोल्हापूर साप्ताहिक रेल्वे सेवा दर गुरुवारी सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे गुरुवारी विनावापर असलेल्या रेकचा वापर या सेवेसाठी करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
पंढरपूर – कुर्डुवाडी मार्गावर लोकल सेवा सुरू करावी जेणेकरून कुर्डूवाडी जंक्शन वरून अनेक लांपल्याच्या गाड्यांना पंढरपूरची कनेक्टिव्हिटी सहज सोपी होईल.
याशिवाय गाडी क्रमांक 22943 / 22944 दौंड – इंदौर – दौंड एक्सप्रेस ही पंढरपूरपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. या सेवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी व प्रवाशांना सुरत, वडोदरा, उज्जैन आणि इंदौरसाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या आठवड्यातून तीन दिवस धावणारी पंढरपूर – दादर – पंढरपूर एक्सप्रेस दैनिक सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या गाडीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने सेवा वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
गोवा, कोकण व कर्नाटकातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नवीन मडगाव – मिरज – पंढरपूर साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंढरपूर येथे गोवा भवन उभारण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या मागणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले असल्याचे परिचारक यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
रेल्वे प्रशासनाने या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अॅड. प्रणव परिचारक यांनी व्यक्त केली आहे. या मागण्यांवर मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव व सुजित मिश्रा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

