कवठेकर प्रशाला आता ‘सौरऊर्जे’वर लखलखणार; १६ किलोवॅटचा प्रकल्प कार्यान्वित!
(संपूर्ण सौरउर्जेवर चालणारी पंढरपूर तालुक्यातील व शहरातील पहिलीच प्रशाला)सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, पंढरपूर एज्युकेशन सोसायटी ची कवठेकर प्रशाला (नाथ चौक), आता पूर्णपणे सौरऊर्जेवर धावणार आहे. रोटरी क्लब पुणे यांच्या सीएसआर (CSR) फंडातून प्रशालेत बसवण्यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प आजपासून यशस्वीरित्या कार्यान्वित झाला असून, शाळेच्या वीज बचतीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
या प्रकल्पातून दररोज १६ kw (किलोवॅट) सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे.
यामुळे प्रशालेतील सर्व संगणक लॅब, पंखे, दिवे आणि इतर सर्व इलेक्ट्रिक उपकरणे आता सौरऊर्जेवर चालणार आहेत.
शालेय स्तरावर अपारंपरिक ऊर्जेचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारी कवठेकर प्रशाला ही पंढरपूर शहर व तालुक्यातील एकमेव प्रशाला ठरली आहे,
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी रोटरी क्लब पुणेचे असिस्टंट गव्हर्नर श्री. धनंजय राजूरकर आणि श्री. अमेय धोत्रे यांनी विशेष पुढाकार घेऊन सीएसआर फंड उपलब्ध करून दिला.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव गुरुवर्य श्री. पटवर्धन सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला. यासाठी मुख्याध्यापक श्री. व्ही. वाय. पाटील सर, प्रशालेचेशिक्षक श्री. चंद्रशेखर राजूरकर सर आणि श्री. प्रवीण उत्पात यांनी गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा केला होता.
”शाळेचा विद्युत खर्च शून्यावर आणण्यासोबतच शाश्वत ऊर्जेचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे,” असे प्रशालेच्या वतीने सांगण्यात आले.
या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाबद्दल पालक आणि पंढरपूरमधील शिक्षण व पर्यावरण प्रेमींकडून कौतुक होत आहे.

