*विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा मिल रोलर पूजन संपन्न!*
*(आम्ही आत्तापर्यंत सर्व शेतकरी सभासदांना 319 कोटी रुपयांचे वाटप केले आहे:- आ. अभिजीत आबा पाटील)*
*(विरोधकांनी कितीही काही टीका केली तरी ऊसदराची स्पर्धा फक्त विठ्ठल कारखान्याने सुरू केली आहे:- आ. अभिजीत आबा पाटील)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन व ऊस तोडणी – वाहतूक कराराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ह.भ.प. श्री.नवनाथ महाराज मोरे (मुंडेवाडी) यांच्या शुभहस्ते मिल रोलर पूजन करून ऊस तोडणी–वाहतूक कराराच्या अर्जाचे विधीवत पूजा करून शुभारंभ करण्यात आला.
मिल रोलर पूजन ४५वा गळीत हंगामाच्या यशस्वी वाटचालीचा प्रारंभ असून, सर्व मशनरी यंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होईल. यंदा अधिकाधिक गाळप करण्याचा मानस अधिकारी, व सर्व संचालक मंडळाचा असेल, अधिक गाळप झाल्याने शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल.
अधिवेशन व मुख्यमंत्री महोदयांकडे देखील एफ.आर.पी. व साखरेच्या किमान विक्री दरातील तफावतीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मांडल्या असून महाराष्ट्र शासनानेही प्रति मे.टन रु.६०० अनुदान द्यावे,अशी मागणी यावेळी केली असल्याचे सांगितले.
ह.भ.प.नवनाथ महाराज मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, श्री विठ्ठल कारखाना ही केवळ संस्था नसून एक आध्यात्मिक शक्ती आहे. सभासद शेतकरी व कामगार हेच या कारखान्याचे खरे बळ असून, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हा कारखाना प्रगतीपथावर राहील.
बंद अवस्थेत असलेला कारखाना ते उच्चांकी गाळप करून सभासदांच्या जीवनात आनंद फुलवण्याचं काम आपल्याच पाठिंब्यामुळेच शक्य झाले असून सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. येणाऱ्या पुढील हंगामात यापेक्षाही जास्त गाळप करूया असा विश्वास यावेळी उपस्थितांना दिला.
यावेळी पंचक्रोशीतील नेते मंडळी, कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, तोडणी वाहतूक ठेकेदार, सहकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

