*दक्षिण काशी हादरली! महिलांच्या स्वच्छालयात पुन्हा चित्रीकरणाचा गंभीर प्रकार!*
*(मंदिर परिसरातील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर नगरीत अधिक महिन्यानिमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत असताना मंदिर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महिलांच्या सुलभ स्वच्छालयात चोरून व्हिडिओ शूटिंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
नुकत्याच काल महाद्वार परिसरातील महिलांच्या सुलभ स्वच्छालयात एका अज्ञात इसमाने महिलेचे चोरून शूटिंग करत असताना नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर संबंधितावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी शेजारील महिलांच्या सुलभ स्वच्छालयात असाच संतापजनक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेला स्वच्छालयामध्ये संशयास्पद हालचाल जाणवली. त्यावेळी तिने वरती एका मुलाचे डोके पाहताच आरडाओरड सुरू केली. महिलेने त्या संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो इसम घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेनंतर संबंधित महिलेने तीव्र संताप व्यक्त करत मंदिर परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. कालच्या घटनेतील पुणे येथील पीडित महिलेने माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांकडे अधिकृत तक्रार दिल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी घटनास्थळी पाहणी करत संतप्त प्रतिक्रिया दिली. “मंदिर परिसरातील महिलांच्या सर्व सुलभ स्वच्छालयांची सुरक्षितता तातडीने वाढवावी, बंदिस्त आणि सुरक्षित स्वच्छालय उभारावीत, अन्यथा पालिका प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पंढरपूरातील मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली असून भाविक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
