शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान; २५ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करा :- *सभापती चेतनसिंह केदार सावंत
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस (डीबीटी) योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्य व उपकरणांच्या खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत कडबाकुट्टी यंत्र, पेरणी यंत्र, ५ एचपी व ७.५ एचपी क्षमतेचे विद्युत ओपनवेल सबमर्सिबल पंपसंच,(पाणबुडी मोटार), श्री पिस्टन स्प्रे पंप, ४ एचपी डिझेल इंजिन, बॅटरीवर चालणारे नेपसॅक स्प्रे पंप, रोटाव्हेटर, ताडपत्री, पल्टी नांगर आणि स्लरी फिल्टर आदी कृषी साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.
शेतीचा वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता आणि आधुनिक शेतीची वाढती गरज लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. अनुदानामुळे शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्य खरेदी करणे अधिक सुलभ होणार असून शेतीच्या कामात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयातील टपाल (आवक-जावक) विभागात जमा करावेत. २५ नोव्हेंबर २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या तसेच अपूर्ण असलेल्या प्रस्तावांचा स्वीकार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी प्रस्ताव सादर करून या अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
