*श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य देणगी स्वरूपात अर्पण!*
*(भाविकांची सुरक्षितता आणि मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था होणार अधिक सक्षम)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
भाविकांची सुरक्षितता तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, शाखा पंढरपूर यांच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांना सुमारे १० लाख रुपये किंमतीचे सीसीटीव्ही साहित्य देणगी स्वरूपात अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. भाविकांची सुरक्षितता, मंदिर परिसरातील विविध हालचालींवर प्रभावी देखरेख तसेच सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण लक्षात घेऊन बुलढाणा अर्बन बँकेच्या सीएसआर निधीतून हे साहित्य देण्यात आले आहे. या देणगीमध्ये १५ पीटीझेड कॅमेरे (५ मेगापिक्सेल, ३६X झूम), १५ नग ४ टीबी इंटरनल हार्ड डिस्क, ८ नग १ टीबी एक्स्टर्नल हार्ड डिस्क, ५ बंडल लॅन केबल आणि ६५ इंची टीव्ही यांचा समावेश आहे.
या अत्याधुनिक सीसीटीव्ही साहित्यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, भाविकांच्या सुरक्षिततेबरोबरच मंदिरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. यावेळी बुलढाणा अर्बन बँकेचे विनोदी भंडारी, सुनील जी. चांडक, विलास कंकाळ, गोविंद माधवराव कदम व रमेश जगदाळे उपस्थित होते. मंदिर समितीच्या वतीने लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
