१२ नोव्हेंबरपासून पंढरपुरात भूसंपादनाचे तात्पुरते कार्यालय सुरू
(कॉरिडॉर बाधितांना दिलासा; आठवड्यातून तीन दिवस कामकाज)
(उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांची माहिती)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी येत्या १२ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवास येथे भूसंपादन अधिकारी क्रमांक ३ यांचे तात्पुरते कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या कार्यालयाचे कामकाज दर आठवड्याला मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस चालणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, बाधित मालमत्ताधारकांना नुकसानभरपाईसंदर्भातील दावे, पुरावे व हरकती सादर करता येणार आहेत. नोटीस प्राप्त झालेल्या संबंधितांनी ३० दिवसांच्या आत स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधी किंवा वकिलामार्फत आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरपुरातच कार्यालय सुरू होत असल्याने बाधित मालमत्ताधारकांचा सोलापूरला जाण्याचा वेळ व प्रवासाचा त्रास वाचणार असून, भूसंपादन प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
