*संविधान बदलून लोकशाही धोक्यात आणण्याचा काँग्रेससह विरोधकांचा डाव*
————————
*(पालकमंत्री जयकुमार गोरे : भाजपाची लोकशाही वाचवा अराजकता हटवा पदयात्रा!)*
————————-
*हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकशाही रक्षणाचा हुंकार : सोलापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग!*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलून भारतातील लोकशाही धोक्यात आणण्याचा काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि विरोधकांचा डाव आहे, असा घणाघात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घातला. विरोधी पक्षांनी देशभरात पसरविलेल्या खोट्या नरेटीव्हच्या विरोधात आणि देशवासीयांसमोर सत्य बाजू मांडण्यासाठी भाजपातर्फे बुधवारी शहरातून ‘लोकशाही वाचवा अराजकता हटवा’ पदयात्रा काढण्यात आली. प्रचंड आक्रमक झालेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या पदयात्रेत सहभागी झालेल्या हजारो भाजपा कार्यकर्ते आणि सोलापूरकरांना संबोधित केले.
या पदयात्रेची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून झाली. यावेळी हजारो तिरंगा ध्वज आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्वजांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साह संचारला होता. या पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या पदयात्रेत सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, तरुण, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही पदयात्रा बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुतीमार्गे महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याजवळ विसर्जित झाली. या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पालकमंत्री गोरे म्हणाले, निवडणूक आयुक्तांच्या राजीनामाच्या आडून विरोधकांना नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तानप्रमाणे अराजकता माजवून भारतातील सरकारसह संविधानही बदलायचे आहे. परदेशातून आलेल्या निधीवर विरोधक आंदोलन उभे करून सर्वोच्च न्यायालय, संविधान, निवडणूक आयोग अशा संविधानिक संस्थांवर दबाव आणत आहेत. आम्हाला हवा तसा निकाल या संविधानिक संस्थांनी द्यावा असे विरोधकांचे म्हणणे आहे. विरोधक निवडणूक आयोगाच्या आडून देशभरातील कोट्यावधी जनतेवर अविश्वास दाखवत आहेत. ज्या काँग्रेसने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात नऊ राज्यांची सरकारे बरखास्त केली, आणीबाणी लादली त्या काँग्रेसला आम्हाला लोकशाही शिकवण्याचा अधिकार नाही, असे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
काँग्रेसने बोगस नावे, बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत घुसवली होती. एसआयआरच्या निमित्ताने ती नावे आता काढून टाकण्यात येत आहेत. याचा राग काँग्रेस आणि विरोधी पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.
सोलापूरचे दोन्ही खासदार ईव्हीएम यंत्रावर निवडून आले. मात्र ते आता त्याच ईव्हीएमवरच शंका उपस्थित करत आहेत. सत्ता आली की ईव्हीएम चांगले आणि सत्ता गेली की ईव्हीएम वाईट असा दुतोंडीपणा विरोधक दाखवत आहेत. निवडणूक आयुक्तांना हटवण्याची विशिष्ट प्रक्रिया संविधानाप्रमाणे बनविलेल्या नियमांत दिली आहे. संविधान कवटाळण्याचे नाटक करणाऱ्या विरोधकांना संविधानातील या तरतुदी माहिती नाहीत का ? असा सवालही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
#देशात यापूर्वी अनेकदा एसआयआर म्हणजेच मतदार यादी पुननिरीक्षणाचा कार्यक्रम झालेला आहे. मात्र विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. मयताचे, स्थलांतर झालेल्यांची, बांगलादेशी घुसखोरांची नावे देखील मतदार यादीत ठेवावीत असे विरोधकांना वाटते. पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूरची पाणीपुरवठा योजना, शक्तिपीठ महामार्ग, उजनी जलाशयाशेजारी होणारा एआय डेटा सेंटरचा प्रकल्प अशा सर्वच विकासात्मक प्रकल्पांना विरोधी पक्षांकडून कारण नसताना विरोध होत आहे, अशी टीकाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी केली.
#या पदयात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, दीपक साळुंखे, राजन पाटील, राम सातपुते, प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर,
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी सहभागी झाले होते.
——–
*(पुष्पवृष्टी करीत व्यापाऱ्यांनी केले उत्स्फूर्त स्वागत!)*
लोकशाही वाचवा, अराजकता हटवा पदयात्रेचे पदयात्रेच्या मार्गावरील व्यापाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केले. देशभरातील समाजघातकी घटकांमुळे देशांमध्ये अराजकता वाढत आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात येत आहे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात भाजपाने सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाने काढलेल्या पदयात्रेस आमचा पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी व्यापाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली होती.
——–
*जंतर-मंतरवर हलगी वाजवल्याने मतदार यादीत नावे येणार नाहीत!*
निवडणूक आयोगाने सूचना देऊन देखील काँग्रेसने अनेक बूथवर प्रतिनिधी नेमले नाहीत. जंतर-मंतरवर जाऊन हलगी वाजवल्याने मतदार यादीत नावे येणार नाहीत. त्यापेक्षा काँग्रेसने जनतेत जावे, काँग्रेसला जनतेने का नाकारले ते पहावे, आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता दिला.
