श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा महासेल
भाविकांना अल्प दरात महावस्त्रे उपलब्ध!
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या तसेच परिवार देवतांच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेली व परिधान केलेली महावस्त्रे भाविक व नागरिकांना अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी “महावस्त्र महासेल” आयोजित करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेल्या या महावस्त्रांना धार्मिक व भावनिक महत्त्व आहे. ही महावस्त्रे प्रसादस्वरूपात आपल्या घरी नेण्याची विशेष संधी या महासेलच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध झाली आहे.
या महासेलमध्ये साड्या, ब्लाऊज पिस, चोळीखण, उपरणे, शाल, शेला, धोतर, सोहळे, लुंगी, टॉवेल, टोपी, नॅपकीन आदी विविध प्रकारची महावस्त्रे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महावस्त्रांच्या किंमती अत्यंत माफक ठेवण्यात आल्या आहेत. उपलब्ध साड्या ₹105 ते ₹7,100, शाल ₹105 ते ₹315, शेला ₹105 ते ₹1,050, सोहळे व उपरणे ₹210 ते ₹3,100, धोतर ₹210 ते ₹1,050 या दरात उपलब्ध आहेत. तसेच ब्लाऊज पिस, टॉवेल, टोपी, नॅपकीन आदी वस्तू ₹105 पासून, तर चोळीखण व लुंगी प्रत्येकी ₹210 दराने उपलब्ध आहेत.
या महासेलमध्ये विविध प्रकारच्या महावस्त्रांचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असून, त्याची एकूण किंमत सुमारे ₹28 लाख इतकी आहे. भाविकांच्या सोयीसाठी महावस्त्राचे प्रकार व दरानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी माता तसेच परिवार देवतांच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात महावस्त्रे अर्पण केली जातात. प्राप्त होणाऱ्या महावस्त्रांसाठी मंदिर समितीच्या वतीने स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून, त्याची जबाबदारी सहाय्यक विभाग प्रमुख एकनाथ दर्शने व विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
श्रींच्या चरणाजवळ प्राप्त होणारी तसेच भेट स्वरूपात येणारी महावस्त्रे नियमानुसार विगतीकरण, मूल्यांकन व पॅकिंग करून भाविकांना स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला आहे. तथापि, अधिक मास व आषाढी यात्रेच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात महावस्त्रे प्राप्त झाल्याने ती भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष “महावस्त्र महासेल” आयोजित करण्यात आला आहे. हा महासेल दि. 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत श्री संत तुकाराम भवन, तिसरा मजला, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेले महावस्त्र प्रसाद स्वरूपात आपल्या घरी नेण्याची ही विशेष संधी असून, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने या महासेलचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले आहे.
