
ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना कमिशन डिपॉझीट रक्कम अदा:मा.आ.बबनराव शिंदे
(पुढील हंगामासाठी दोन्ही युनिट कडून ऊस पुरवठा होण्यासाठी सर्व करार करण्याची कार्यवाही सुरू आहे:- मा.आ.बबनदादा शिंदे)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब या कारखान्याचे सन २०२४-२५ गळीत हंगामामध्ये ऊस तोडणी वाहतूक केलेल्या ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व मुकादम यांचे बँक खात्यावर कमिशन डिपॉझीट रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सन २०२४-२५ गळीत हंगामात युनिट नं.०१ कडे ११ लाख २३हजार ९९९ मे.टन व युनिट नं.०२ कडे ०३ लाख ७५ हजार ७३८ मे.टन असे एकूण १४ लाख ९९ हजार ७३७ मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या ऊस गळीत हंगामामध्ये दोन्ही युनिट कडे ऊस तोडणी वाहतूक केलेल्या ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी व तोडणी मशिन वाहन मालकांना कमिशन डिपॉझीट रक्कम अदा करण्यात आली आहे. या कमिशन डिपॉझीटसाठी कारखान्याने रू.३१.४५ कोटी अदा केले आहेत.
मागील ऊस गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये दोन्ही युनिटकडे ऊस तोडणी वाहतूकीचे काम केलेल्या ऊस तोडणी वाहतूकदारांना हंगामअखेर पर्यंतची संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बिले अदा केली आहेत.कारखान्याने तोडणी वाहतूक बिलासाठी एकूण १२७ कोटी ६८ लाख अदा केले आहेत.
कारखान्याने ऊस गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये युनिट नं.०१कडे २० लाख व युनिट नं.०२ कडे ०६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ निश्चित केलेले आहे. गाळप हंगाम शासनाचे धोरणानुसार सुरू होणार असून ऑफ सिझन मधील कामे वेगाने सुरू आहेत. दोन्ही युनिटकडे या हंगामात गाळपक्षमतेएवढा ऊस पुरवठा होणेसाठी ट्रक/ट्रॅक्टर, ट्रॅक्टरगाडी,बैलगाडी व तोडणी मशिनचे करार करणेची कार्यवाही सुरू करणेत आलेली आहे. आजअखेर करार करणेत आलेल्या यंत्रणेस लवकरच धोरणानुसार ॲडव्हान्स वाटप करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापाने घेतलेला आहे. ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व मुकादम यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क करून ट्रक/ट्रॅक्टर, ट्रॅक्टरगाडी,बैलगाडी व तोडणी मशिनचे चे करार करावेत असे आवाहन मा.आ.शिंदे यांनी केले.
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,कार्यकारी संचालक,जनरल मॅनेजर व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.