सिना माढा उपसा सिंचन योजनेचा तृतीय सुप्रमा सादर करण्याची उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची सुचना
आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांनी या संदर्भात मिटींग लावणेची मागणी मागील आठवड्यामध्ये केली होती त्यानुसार आज मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, कुर्डू, पिंपळखुंटे, अंबाड, अंजनगांव(खे) या कायम दुष्काळी गावांना सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी शासनाचे कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मंजूरी मिळाली असून तृतीय सुप्रमा सादर करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, शासन निर्णय दि.28 फेब्रुवारी,2024 रोजीच्या निर्णयामुळे माढा तालुक्यातील बावी,तुळशी, पिंपळखुंटे अंबाड ,परितेवाडी, कुर्डू, अंजनगांव(खे) गावांचा या योजनेंतर्गत समावेश आहे. माढा तालुक्यातील सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे बचत झालेल्या पाण्यातून या गावांना पाणी देण्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दि.26/06/2024 रोजीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या गावांतील विकेंद्रीत जलसाठे भरुन घेणेसाठी तृतीय सुप्रमा तयार केल्यानंतर निधी उपलब्ध होणार असुन याबाबत तृतीय सुप्रमा सादर करणेसाठी दि.01/07/2024 रोजी मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीत संबधीत अधिकाऱ्यांना तृतीय सुप्रमा तातडीने सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सदर बैठकीस आमदार बबनदादा शिंदे आमदार संजयमामा शिंदे, अप्पर मुख्य सचिव नियोजन राजगोपाळ देवरा,अप्पर मुख्य सचिव वित्त ओ.पी.गुप्ता,डॉ.संजय वेळसरे, सचिव लाभक्षेत्र, अतुल कपोळे, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ, हणुमंत धुमाळ ,मुख्य अभियंता ह.वि.गुणाले यांचेसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
चौकट-
माढा तालुक्यातील खैराव-मानेगांव उपसा सिंचन योजनेस शासनाकडून तत्वत: अंतिम मान्यता मिळाली असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निधीची तरतूद होणार आहे यामध्ये माढा तालुक्यातील पुर्व भागातील मानेगांव ,धानोरे, बुद्रुकवाडी, कापसेवाडी, हटकरवाडी,पाचफुलवाडी कायम दुष्काळी गावांना पाणी उपलब्ध होणार असून सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर योजनेला प्रशासकीय मान्यता देणेसाठीचा प्रस्ताव सादर करणेसाठी संबंधीत अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुचना दिल्या
-आ.बबनदादा शिंदे