
अजित पवार बोलले ती वक्तव्य किती खरी ठरली?प्रपंचाची राख रांगोळी करण्याचं काम तर या संचालक मंडळानंच केलं:रंजन तावरे
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. परंतु माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथे सहकार बचाव शेतकरी पॅनलचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रंजन तावरे म्हणाले, माझं आव्हान आहे. मुलाखती कशाला घेताय? जे जुने संचालक मंडळ कर्तबगार आहे. म्हणून तुम्ही सांगता, त्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना तिकीट द्या. कारण ते लबाडीने आलेलं संचालक मंडळ आहे. त्या संचालक मंडळाची सुरुवातच लबाडीतून झाली आहे. त्यावेळेस तुम्ही सभासद आम्हाला सगळे विचारत होता, काका आम्ही तुम्हाला मते दिली आहेत. कुठे गेली मते? आम्हाला मते सांभाळता आली नाहीत, का? तर सत्तेच्या गैरवापरामुळे! 30 टक्के मते बाद होतात. रेघा मारून.
माझा शेतकरी त्याला मतदान बाद करायचं असतं, तर मतदानाला आला नसता. मतदान 21 मते देताना तो कधी पेन काढणार? आणि तो कधी रेघा मारणार? महाराष्ट्राच्या इतिहासात हा नवा पराक्रम अजित पवार तुमच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्या अधिकाऱ्याला काय दिलं, काय नाही दिलं, तुमच्या मनाला विचारा आणि का आमची सत्ता हीच खाऊन घेतली गेल्यावेळेसची. आमच्या प्रपंचाची राख रांगोळी करण्याचं काम या संचालक मंडळांना केलं. शेकडो कोटीचं कर्ज काढून माळेगावचा छत्रपती करण्याची किमया माळेगावचा सुज्ञ सभासद हे तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. अशी टीका रंजनकुमार तावरे यांनी केली.
पुढे बोलताना तावरे यांनी, माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सत्ताधीशांच्या चुकीच्या आणि गलथान कारभारामुळे चार महिने उशिरा घेतली जात आहे. गलथान कारभार झाकून चुकीच्या पद्धतीने कर्ज काढून सभासदांची दिशाभूल करण्याच महापाप करण्यासाठी ही निवडणूक उशिरा घेतली जात आहे.
सातत्याने तर चढत्या क्रमाने एफ आर पी पेक्षा सरासरी काढली, तर प्रत्येक वर्षी 400 रुपये टनाला तत्कालीन माझ्या संचालक मंडळांने केलं.
मागील पंचवार्षिक निवडणूक 39 दिवस अगोदर घेतली. या उपमुख्यमंत्र्यांना त्यावेळी वाटत नव्हतं की, ठाकरे- पवार सरकार टिकेल का नाही? नाही टिकलं तर माळेगाव सहकारी साखर कारखाना अण्णा काकाच्या ताब्यात राहील. परत एकदा पवार साहेबांची इच्छा आहे की, माळेगाव कारखाना ताब्यात आला पाहिजे.पवार साहेबांच्या नावाने भावनावश करून लबाडीच्या मार्गाने कारखाना ताब्यात घेतला. मग तुम्ही पवार साहेबांना किती वेळा बोलावलं कारखान्यावर?
2007 मध्ये ज्यावेळी आमचे सात सहकारी निवडून आले होते. पवार साहेबांनी सात वर्ष जनरल मिटींगला कॉलेज वरती पाय ठेवला नाही. म्हणून 2015 ते 2020 यावेळी आमचं संचालक मंडळ आलं. पुढच्या प्रत्येक कॉलेजच्या मिटींगला पवार साहेब हजर राहिले. अजित पवार यांनी जी वक्तव्य केली होती, ती किती वक्तव्य खरी ठरली? ही नदीकाठी आपली सभा आहे नदीकाठच्या सांगवी, कांबळेश्वर, शिरवली, खांडज, सोनगाव पर्यंत सगळा नदीकाठ खराब होत गेलाय. खांडज गावामध्ये याच उपमुख्यमंत्र्यांनी सभासदांना आवाहन केलं माझं पॅनल निवडून द्या. दोन महिन्याच्या आत या खांडजच्या नदीचं पाणी नाही स्वच्छ करून दिलं, तर निवडणुकीला आमदारकीचं मतदान मागायला येणार नाही. अशीही टीका रंजनकुमार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
पुढे बोलताना तावरे यांनी, वयाच्या 85 या वर्षांमध्ये तुमच्या माझ्या प्रपंचासाठी, तुमच्या माझ्या मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी शेतकऱ्याला मग तो अगदी राष्ट्रवादीचा असू द्या, त्याला जाऊन सांगा. अण्णा – काकाच्या ताब्यात दिल्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसाला दोन पैसे अधिकचे मिळणार आहेत हा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला देखील आलेला आहे. माळेगावच्या गलथान कारभार आपल्याला सुरळीत करायचा आहे. आमच्या उमेदवारांना काही अमिष दाखवायला लागले आहेत. एकही जाणार नाही. फुटणार नाही. पण चाललंय, तुम्हाला आमिष; आम्हाला आमिष दाखवणार! माझ्या शेतकऱ्यासाठी जे 28 वर्षे संघर्षाचे काम केलं, तेच संघर्षाचे काम शेतकऱ्यांच्या मुलाबाळासाठी करून अधिकचे पैसे देऊन त्याचा घास गोड कसा करता येईल.असेही रंजनकुमार तावरे म्हणाले.
तसेच राज्याच सरकार तुमच्या ताब्यात पाच वर्षे आहे. केंद्रात तुमचे मोदी साहेबांशी संबंध आहेत. अमित शहांचं नाव वारंवार घेता. राज्यातली सत्ता केंद्रातील सत्ता आमच्याकडे आहे म्हणून सांगता. मग त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचे भलं करण्याचं स्वप्न तुम्ही का विसरला? इच्छाशक्ती असल्यानंतर शंभर टक्के करता येतं! असेही रंजनकुमार तावरे म्हणाले.