
आदिनाथ कारखान्याची निवडणूकीत तिरंगी लढत लागण्याची शक्यता?आजच्या दिवशी 250 अर्ज राहिले आहेत
अदिनाथच्या निवडणूकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता?
आदिनाथच्या निवडणुकीत प्रा.रामदास झोळ यांचेच पारडे राहणार जड?
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही माघार घेतली आहे. कारखान्याच्या हिताचा विचार करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यांच्याशी चर्चा करून आम्ही आदिनाथच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
बागल, जगताप यांच्या माघारीनंतर ‘आदिनाथ’च्या रिंगणात आता आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे आणि प्रा.रामदास झोळ यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.
जयवंतराव जगताप यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे किती लोकांचे अर्ज माघारी घेतली जातात आणि रिंगणात किती उमेदवार राहतात की आदिनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की, तिरंगी होणार याची उत्सुकता करमाळा तालुक्याला लागून राहिली आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, अशी भूमिका मांडली होती. आमच्या काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्जही भरले आहेत. मात्र, कारखान्याचा आतापर्यंतचा इतिहास पाहता आतापर्यंतच्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे आर्थिक हितसंबंध ठेवून काम केलेले आहे, असेही माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी स्पष्ट केले.
यावेळी जयवंतराव जगताप म्हणाले की, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर चर्चा करून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक लागल्यास आदिनाथ कारखान्याचे सभासद योग्य तो निर्णय घेतील. ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून कारखाना चालविणाऱ्यांना आम्ही सहकार्य करू असे ही त्यांनी सांगितले आहे.
तरी आदिनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की, तिरंगी लढत होणार का या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार याची उत्सुकता तालुक्यासह जिल्ह्याला लागून राहिली आहे.