पंढरपूर शहरातील जड वाहतूक तातडीने बंद करा!
(बाह्यवळण मार्गावरून वळविणेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना नगरसेवकांनी दिले निवेदन!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व नगरसेवकांच्या वतीने पंढरपूर शहरात होत असलेली जड वाहतूक बाह्य वळण मार्गावरून वळवावी म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सूचनेवरून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे व पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना गटनेते वासुदेव बडवे, सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, ॲड.सुनिल वाळूजकर,धर्मराज घोडके, सौरभ थिटे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित पानकर यांच्या शिष्ट मंडळाने निवेदन दिले
यावेळी शहरात वाढत असलेल्या जड वाहतुकीच्या गंभीर समस्येकडे वेधण्यात आले गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवरून अवजड वाहनांची (ट्रक, कंटेनर, डंपर) मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर शहरांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
शहरातील अरुंद रस्ते आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच श्री संत पुंडलिक पुलावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्या लगतची सुरक्षित लोखंडी कठडा मोठ्या वाहनामुळे तुटला होता तसेच अवजड वाहनांमुळे शहरातील मुख्य चौकांमध्ये तासन्तास वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका रुग्णवाहिका, शालेय बस आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांना बसत आहे.
पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने सोलापूर व कुर्डुवाडी भागातून येणाऱ्या बसेस आंबाबाई पटांगण, अर्बन बँक, भिंगे चौक मार्गे बसस्थानकात जातात. तसेच आंबाबाई पटांगण व अर्बन बँक येथे बस थांबा असल्यामुळे तेथे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सोलापूर व कुर्डुवाडी मार्गावरील बसेस अहिल्यापुलावरून बसस्थानकात वळविण्यात याव्यात किंवा बस फक्त अंबाबाई पटांगण येथेच थांबवावे अर्बन बँक येथे बसला थांबा देऊ नये
शहरातील मुख्य बाजारपेठ आणि गर्दीच्या भागातून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. सर्व अवजड वाहने शहराबाहेरील बाह्यवळण मार्गावरून (By-pass) वळविण्यात यावीत.
शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांसाठी कठोर वेळापत्रक लागू करण्यात यावे. (उदा. रात्री ९ ते सकाळी ८ या वेळेतच प्रवेश देण्यात यावा.) अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी या बाबत शहरातील व्यापाऱ्यांची बैठकी आयोजित करावी.पंढरपूर शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर लोखंडी कमान (बॅरीयर) उभारण्यात यावेत जेणेकरून मोठी वाहने शहरात येणार नाहीत अशी मागणी करण्यात आली
यावेळी प्रशांत डगळे साहेब यांनी पंढरपूर शहरात जड वाहतूक होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जातील तसेच जुना अकलूज रोड, के बी पी कॉलेज लिंक रोड, प्रबोधनकार ठाकरे चौक, मध्यप्रदेश भवन जवळ व पंढरपूर नगरपालिका जवळ लोखंडी बॅरियर नगर परिषदेच्या माध्यमातून बसवले जातील तसेच शहरात ज्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे अशा ठिकाणी रस्त्यावर स्पीड ब्रेकर करावेत अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या कडे करण्यात आल्याची माहिती दिली
यावेळी गटनेते वासुदेव बडवे, सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, ॲड.सुनिल वाळूजकर,धर्मराज घोडके, सौरभ थिटे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित पानकर, गुरुदास अभ्यंकर,शरद माने,मालोजी शेंबडे,अशोक शिंदे,गणेश शिंदे ,सिकंदर ढवळे सर हे उपस्थित होते.
