आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्याच वस्तीत अस्वच्छतेचे साम्राज्य!
(विक्रम शिरसट यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा दिला इशारा)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील १९७ ब, रामबाग रोड झोपडपट्टी परिसरात नगरपालिकेच्या आरोग्य विभागात सेवा देणारे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. मात्र, याच परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाईन आणि उघड्या गटारींचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या भागातील महिलांनी एकत्र येत माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांना परिसरात बोलावून आपल्या समस्या मांडल्या. नागरिकांनी सांगितले की, गेल्या एक-दोन महिन्यांपासून ड्रेनेजची चेंबर्स तुंबून ओव्हरफ्लो होत असून मैलायुक्त पाणी थेट घरांमध्ये शिरत आहे. तसेच परिसरातील गटारी सतत तुंबलेल्या अवस्थेत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे.
स्थानिकांच्या मते, या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे तसेच हृदयविकारासारखे आजार उद्भवत आहेत. वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
यावेळी विक्रम शिरसट यांनी नगरपालिकेच्या कारभारावर टीका करत, “आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच अस्वच्छ वातावरणात राहावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल उपस्थित केला. तसेच तातडीने प्रश्न मार्गी न लावल्यास हे महिला मिश्रित पाणी नगरपालिकेच्या दालनात आणून टाकू तसेच नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
