*कार्तिकी वारीत वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्या; आरोग्य यंत्रणेला सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचे निर्देश!*
*(आरोग्य समितीच्या मासिक सभेवेळी सभापती चेतन सिंह केदार सावंत यांनी दिले स्पष्ट शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना आदेश!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आगामी कार्तिकी एकादशी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज राहून वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वारी काळात आरोग्य सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिल्या.
जिल्हा परिषद सोलापूर येथे सभापती चेतनसिंह केदारसावंत यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व शिक्षण समितीची मासिक सभा पार पडली. या सभेत जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सभेत राष्ट्रीय कुटुंब कल्याण, माता व बाल आरोग्य, कुष्ठरोग निर्मूलन, क्षयरोग नियंत्रण, हिवताप आणि हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. याशिवाय औषधसाठा, आरोग्य सुविधा ॲप, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे प्रश्न, जन आरोग्य समिती सदस्यांची निवड तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.
जन आरोग्य संवाद यात्रेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळनेर (ता. माढा) यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशंसा केली होती. या उल्लेखनीय कामाची दखल घेत आरोग्य व शिक्षण समितीच्या सभेत ठराव मंजूर करून सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात पिंपळनेर आरोग्य केंद्राचे अभिनंदन केले. तसेच बार्शी तालुक्यात बोगस डॉक्टरांविरोधात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेचेही सदस्यांनी कौतुक केले.
गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागू नये, यासाठी शासकीय आरोग्य संस्थांनी दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आरोग्य संस्थेत औषधांचा तुटवडा जाणवता कामा नये. औषधांच्या उपलब्धतेबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश केदार सावंत यांनी दिले. तसेच लसीकरणाची प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रनिहाय आकडेवारी पुढील सभेत सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी नव्या ॲपद्वारे योजनांची माहिती संकलित करून अद्ययावत ठेवावी. सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचवावा. आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही सभापती केदार सावंत यांनी दिली.
या सभेस समिती सदस्य सोनाली परसम्मा कडते, संदीप अमृत टेळे, नागनाथ पांडुरंग भोसले, सविता संजय कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिवंत, प्रशासन अधिकारी डॉ. वरवटकर, श्री. मंजूळ, श्री. निटोरे, पीएचएन प्रतिनिधी, श्री. गोपाळ शिंदे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
