*पंढरपूरच्या विकासाला ५ कोटींचे बळ! नगराध्यक्ष डॉ. प्रणिताताई भालके यांच्या प्रयत्नांना यश;*
*(उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून निधी मंजूर!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता ताई भगीरथ भालके यांच्या विशेष प्रयत्नांना मोठे यश आले असून, कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध अनुज्ञेय विकासकामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेला तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तसेच शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार ‘राज्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा-रस्ता अनुदान (अनिवार्य)’ या योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रात कार्तिकी यात्रेनिमित्त अनुज्ञेय विकासकामे करण्यात येणार आहेत. कार्तिकी यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर शहरातील आवश्यक पायाभूत सुविधा, रस्ते तसेच यात्रेशी संबंधित आवश्यक कामांना गती मिळण्यास या निधीमुळे मोठी मदत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रणिता ताई भगीरथ भालके यांनी दिली.
पंढरपूर शहर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, शहराचा विकास साधणे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणे, यासाठी नगराध्यक्ष डॉ. प्रणिता ताई भालके सातत्याने प्रयत्नशील आहेत.
पदभार स्वीकारल्यापासून शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध प्रश्न शासनदरबारी मांडून आवश्यक निधी मिळविण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून शहराच्या विकासकामांना चालना देण्यावर त्यांचा भर आहे.
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याने पंढरपूरच्या विकासाला निश्चितच बळ मिळणार असून, आगामी काळात शहरातील विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष डॉ. प्रणिताताई भालके यांच्या प्रयत्नांतून मिळालेला हा निधी पंढरपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यांच्या कार्यतत्परतेचे आणि शहराच्या विकासाप्रती असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.
