
निराधार लाभार्थ्यांसाठी सहा ते तेरा मे पर्यंत केवायसी कॅम्प घेण्यास सुरुवात
माढा तालुक्यातील 18 हजार लाभार्थ्यांना होणार फायदा:बबनराव शिंदे
माढा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना/ श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना मागील चार महिन्यापासून त्यांचे वेतन मिळाले मिळालेले नाही, याबद्दल माजी आमदार बबनराव शिंदे यांनी माढ्याच्या तहसीलदार यांच्याशी मागील पंधरा दिवसांपूर्वी चर्चा करून मंडलनिहाय ‘केवायसी कॅम्प’ लावण्याची सूचना केली होती. माढा तालुक्यात अकरा महसूल मंडल असून तालुक्यात एकूण 18हजार 714 लाभार्थी आहेत. मागील चार महिन्यापासून शासनाकडून या लाभार्थ्यांना माढा येथे तालुक्याच्या ठिकाणी येऊन केवायसी पूर्ण करा असे सांगण्यात येत होते ,परंतु यातील अनेक व्यक्ती अंध, अपंग, वृद्ध ,वयस्कर, काही दूर्धर आजाराने ग्रस्त असे लाभार्थी आहेत व त्याला त्यांना चालणे ,प्रवास करणे या बाबी अशक्य असल्याचे बबन दादा शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले होते.
या सर्व बाबीचा विचार करून सध्या माढा तालुक्याची तहसीलदार पदाची अतिरिक्त जबाबदारी असलेल्या शिल्पा ठोकडे यांनी माढा तालुक्यातील माढा, दारफळ ,म्हैसगाव, रोपळे क., कुर्डूवाडी, लवूळ, मोडनिंब, टेंभुर्णी, रांजणी ,निमगाव टे. व बेंबळे या ११ महसूल मंडळामध्ये सहा मे ते तेरा मे या कालावधीत संजय गांधी निराधार योजना/ श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांनी देखील संबंधित लाभार्थ्यांना मदत व सहकार्य करावे असे आव्हान आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.
लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी हयातीच्या दाखल्याबरोबरच स्वयंघोषित पत्र, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, दुर्धर आजार असल्यास तसे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व मोबाईल नंबर देणे बंधनकारक आहे. या सर्व कागदपत्रांच्या ऑनलाइन नोंदी होणार आहेत.
शासन ते लाभार्थी बँक खाते पैसे जमा होणार यापूर्वी संबंधित लाभार्थ्याचे अनुदान शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे कडून तहसील कार्यालय व तेथून नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होते, परंतु यापुढे शासनाकडून डायरेक्ट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.
( डीबीटी —-डायरेक्ट बँक ट्रांजेक्शन)
मी मौजे बेंबळे येथील रहिवासी असून मागील चार महिन्यापासून या योजनेच्या पैशा पासून वंचित आहे, याबद्दल मी आदरणीय बबनदादा यांच्याशी माझे व माझ्यासारख्या अनेकांचे गाऱ्हाणे सांगितले असता दादांनी तहसीलदार यांना मंडलनिहाय केवायसी कॅम्प लावण्याचे सांगितले होते. त्यानुसार आता सहा मे ते 13 मे प्रत्येक गावातील संबंधित लाभार्थ्यांना केवायसी करता येईल व आता नवीन झालेल्या सोयीप्रमाणे (डीबीटी) तालुक्यातील 18 हजार लाभार्थ्यांचे पैसे शासनाकडून डायरेक्ट बँकखात्यावर जमा होतील
सदाशिव कांबळे
अंध लाभार्थी, बेंबळे तालुका माढा