शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून निमंत्रण : सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
आषाढी यात्रा दरवर्षी आषाढी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन २०२४ यावर्षी आषाढी यात्रा बुधवार, दिनांक १७ जुलै, २०२४ रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्रीं विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिनांक 25 जून रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबत माहिती घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या. आषाढी यात्रा कालावधी दर्शन रांग, पत्राशेड, दर्शन मंडप, येथे येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांची तसेच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे याबाबत केलेल्या नियाोजनाची माहिती मंदीर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली