*(शक्तीपीठ महामार्गाचा रूट बदला अन्यथा, पुढील आठवड्यात वर्षा निवासस्थानासमोर आत्मदहन करणार)*
*(जुने नको आणि नवे नको शक्तीपीठ महामार्ग आमच्या सर्वांसाठी धोकादायक शेतकऱ्यांनी केल्या भावना व्यक्त)*
*(प्राचीन अशी आमची देव देवतांची मंदिरे आम्ही या रस्त्यासाठी पाडू देणार नाही:-रोहीत मोहीते)*
सांगली जिल्हा प्रतिनिधी
देशातील पहिले मानवनिर्मित वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळख असलेल्या यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य परिसरातून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग नेण्याचा निर्णय तातडीने बदलावा, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा वृक्षमित्र धों. म. मोहिते यांचे नातू रोहित मोहिते यांनी दिला आहे.
रोहित मोहिते यांनी ही भूमिका मांडली. सागरेश्वर अभयारण्याची निर्मिती धों. म. मोहिते यांच्या अथक प्रयत्नांतून झाली असून हरणांचे माहेरघर म्हणून त्याची ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. अशा संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रातून शक्तिपीठ महामार्ग नेण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. अभयारण्यातील वन्यप्राण्यांसाठी राखीव असलेल्या पूर्व विभागातून महामार्गाचा प्रस्तावित मार्ग जात असून सुमारे ७५० मीटरचा बोगदाही नियोजित आहे.
पर्यावरणाचा विचार करून सरकारने पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक व तज्ज्ञांची मते जाणून घ्यायला हवी होती. मात्र अभयारण्याच्या संवर्धनाऐवजी त्यावर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. जनता आधीच त्रस्त असताना सरकारने शेतकऱ्यांच्या भावना आणि पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली. मार्ग बदलावा, अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे मोहिते यांनी सांगितले.

