
आषाढी यात्रा काळात वारकऱ्यांसाठी ०४ लाख लिटर पाण्याचे नियोजन:-मुख्याधिकारी महेश रोकडे
(चंद्रभागा वाळवंट, भक्ती सागर पत्रा शेड दर्शनबारी रोड यासह इतर ठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध होणार)
येत्या ०६जुलै रोजी साजरा होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर नगर परिषद पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला असून आलेल्या लाखो भाविकांची तहान भागविण्यासाठी दररोज सुमारे ०४ कोटी लिटर स्वच्छ व निर्जंतुक पाण्याची व्यवस्था करण्यात आली. असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.
पंढरपूर नगरपरिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रमुख मूलभूत सेवा सुविधांमध्ये पाणी वितरण ही व्यवस्था अतिशय महत्वपूर्ण आहे.आषाढी वारीच्या निमित्ताने गतवर्षी वीस लाखांहून अधिक वारकरी भाविकांनी आपली हजेरी लावली होती.यंदाही हाच आकडा अपेक्षित धरुन पाणी पुरवठा विभागाने आपले नियोजन केले आहे.वारीपूर्वी पाणी साठवण्याच्या टाक्याची स्वच्छता व देखभाल दुरुस्तीची आवश्यक ती कामे पूर्ण केली आहेत. विद्युत मोटारींची आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे.
अष्टमी ते पौर्णिमा या काळात मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गावर असलेली भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या परिसरात दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.भक्ती सागर, चंद्रभागा वाळवंट,पत्राशेड दर्शनबारी, गोपाळपूर रोड या परिसरात नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.वाखरी येथील पाण्याचा हौद,पालखी तळ पाणी पुरवठा आणि शौचालयासाठी नवमी ते दशमी या कालावधीत चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
पाण्याचे शुद्धीकरण आणि निर्जंतुकीरण करण्यासाठी टी सी एल पावडर, क्लोरिन वायू,पी ए सी पावडर,फेरीक ॲलम आदी औषधांचा आवश्यक साठा करण्यात आला आहे. भाविकांचे टँकर भरुन देण्यासाठी मनिषानगर पाणी पुरवठा केंद्र व भक्त सागर येथे स्वतंत्र व्यवस्था केली आहे. याठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याचे मोफत टँकर भरुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
वारीच्या काळात भाविकांना पिण्याचे व सांडपाण्याची कमतरता भासणार नाही याची पूर्ण दक्षता पंढरपूर नगर परिषदेने घेतलेली असून पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पाणी पुरवठा विभागाचे पाणी पुरवठा अभियंता राजकुमार काळे, दीपक जाधव,भूषण घोडके, विठ्ठल खिलारे, सतीश क्षीरसागर, विठ्ठल वाघे आदीसह ऐशीहून अधिक कर्मचारी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सज्ज झाले आहेत