*टेंभुर्णी येथे ऐतिहासिक रस्ता रोको आंदोलन एआय डेटा सेंटर! आणि सौर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध*
*(हे उजनी धरण आमच्या आजोबांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथून सोलापूर जिल्ह्यात आणले आहे:-खासदार धैर्यशील मोहिते पाटील)*
*(AI डेटा सेंटरच्या विरोधामध्ये, उजनी भिमानगर येथे, शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या *उजनी धरणाच्या बचावासाठी* आज दि. 31 ऑक्टोबर 2026 रोजी टेंभुर्णी-रांजणी परिसरात हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत ऐतिहासिक रस्ता रोको आंदोलन केले. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65, रांजणी चौक येथे हे आंदोलन 3 ते 4 तास चालले.
*काय आहे शेतकऱ्यांचा विरोध?*
महाराष्ट्र शासनाने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रस्तावित केलेल्या
1) हायपर स्केल AI डेटा सेंटर प्रकल्प
2) तरंगता सौर ऊर्जा व बॅटरी एनर्जी स्टोरेज (SEED) प्रकल्प
या दोन प्रकल्पांमुळे उजनीचे पाणी कमी होईल, जलाशय प्रदूषित होईल आणि सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या शेती पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आंदोलनस्थळी बोलताना शेतकरी नेत्यांनी सांगितले, “उजनी आमच्यासाठी फक्त धरण नाही, तर जगण्याचा आधार आहे. विकासाच्या नावाखाली आमच्या पाण्यावर डल्ला मारू देणार नाही. जोपर्यंत सरकार हे प्रकल्प रद्द करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
*महामार्गावर चक्काजाम, पर्यायी मार्गावर वाहतूक वळवली*
आंदोलनामुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आधीच दिलेल्या सूचनेनुसार वाहतूक मोहोळ-पंढरपूर-अकलूज-इंदापूर या पालखी महामार्गावर वळवण्यात आली होती, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेतकऱ्यांनी शांततेत आपला विरोध नोंदवला.
आजच्या या आंदोलनाने सरकारला मोठा इशारा दिला असून, आता शासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
