CRS पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे जन्म-मृत्यू दाखल्यांचे कामकाज ठप्प
(विक्रम शिरसट यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या CRS पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे जन्म व मृत्यू दाखल्यांच्या नोंदणीचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषदेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत यापूर्वी एका युजर आयडीद्वारे तीन ते चार ठिकाणी लॉगिन करून कामकाज सुरळीतपणे पार पाडले जात होते. मात्र, २५ मे २०२६ पासून एका युजरवर केवळ एकदाच लॉगिन करण्याची अट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदींची प्रक्रिया संथ झाली असून अनेक अर्ज प्रलंबित राहू लागले आहेत.
सध्या शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने जन्म दाखल्यांची मागणी वाढली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना वेळेत दाखले मिळत नसल्याने पालकांची धावपळ वाढली आहे. याशिवाय वारंवार सर्व्हर डाऊन होणे, पोर्टलचा वेग अत्यंत कमी असणे तसेच काही वेळा संपूर्ण प्रणाली बंद पडणे यामुळे दैनंदिन कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होत असल्याची माहिती नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने दिली आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तोडगा काढावा आणि नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी विक्रम शिरसट यांनी नगरपालिका मुख्य अधिकारी आणि प्रांताधिकारी यांची भेट घेऊन केली आहे.

