मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा -शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर सांगोल्यातील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची सांगता

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मराठी साहित्य जसे फुलत गेले पाहिजे तशी मराठी भाषा सुध्दा टिकली पाहिजे. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. त्यांच्या पाठीशी शासन नेहमीच राहील, अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर यांनी आज दिली.
सांगोला येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. ग. दि. माडगुळकर साहित्य नगरी, सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे आयोजित या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, आ. शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिवाजीराव काळुंगे, भाऊसाहेब रुपनर, रफिक नदाफ आदि उपस्थित होते.
मंत्री ना. दीपक केसरकर म्हणाले,  मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावी, यासाठी मराठी माणसाने लढा दिला. त्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये मराठी टिकली पाहिजे. मुंबईमध्ये भव्य असे मराठी भवन व साहित्य भवन बांधणार असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.खंडीत झालेली ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची परंपरा आ.शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा सुरु केली आहे, याबद्दल त्यांनी कौतुक केले.
मंत्री ना. दीपक केसरकर म्हणाले, मराठी भाषा, मराठी साहित्य याला वेगळे करता येणार नाही. मराठी क्रांती, मराठी चित्रपट सृष्टी, मराठी गीते हा जरी साहित्याचा भाग असला तरी साहित्य आणि मराठी भाषा हे अविभाज्य नाते आहे. इंग्रजाच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी यावर्षीपासून अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीतून व पुढच्या वर्षीपासून वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माणदेशातील माणसे ताठ मानेने जगणारी असल्यामुळे या परिसराला माणदेश नाव पडले आहे, असे सांगत स्वागताध्यक्ष आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, सर्वाधिक शक्ती भाषेमध्ये असून आवाजात बदल झाला तरी भाषेत बदल होतो, ही भाषेची ताकद आहे. मराठी भाषा आपल्या आई समान असून यापुढील काळात मराठी भाषा मजबूत झाली पाहिजे. मराठी भाषेची आवड प्रत्येक तरुणाला झाली पाहिजे. त्याचप्रमाणे विचाराचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी संमेलन सुरु केले आहे. सांगोल्यात एक यशस्वी साहित्य संमेलन पार पडले असून यापुढील 3 ते 4 वर्षात हे संमेलन समुद्रासारखे पसरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव म्हणाले, सांगोल्यातील साहित्य संमेलनात एकापेक्षा एक सुंदर कार्यक्रम संपन्न झाले. साहित्यीक व लेखकांनी साहित्य संमेलनात अतिशय महत्वाचा दस्तऐवज तयार केला आहे. त्यांचे भाषणाचे लेखन व त्यांचा सुंदर ग्रंथ तयार करावा. सांगोल्यातील साहित्याची चळवळ यापुढील काळात अशीच मोठी होत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या मुलांनी आत्महत्त्या करु नये ही कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, गौरवमुर्ती योगीराज वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. द. ता. भोसले, योगिराज वाघमारे, भास्कर चंदनशिवे, डॉ. कृष्णा इंगोले या गौरवमुर्तीना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन भीमाशंकर पैलवान यांनी तर आभार अ‍ॅड. उदय घोंगडे यांनी मानले.
 
चौकट:-

मंत्री ना. दीपक केसरकर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचे कौतुक यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे कौतुक केले. श्री.स्वामी यांनी चांगले उपक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविलेले आहेत. आदर्श शिक्षण कसे असावे यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले.अशा पध्दतीचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here