बिरसा मुंडा यांचा इतिहास सदोदित प्रेरणादायी                                                                             -प्रा. यशपाल खेडकर स्वेरीत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर- ‘आज काहींचा इतिहास प्रकाशात असतो तर काहींचा इतिहास अंधारात,असाच एक दुर्लक्षित राहिलेला योद्धा म्हणजे बिरसा मुंडा होय. मुंडा यांनी अवघ्या पंचवीस वर्षात आदिवासी समाजजीवनात आणि पर्यायाने देशात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अखंडित कार्य केले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी विरोध पत्करत प्राणाची आहुती दिली, अनेक जण हुतात्मा झाले. आज अशा योध्यांचा इतिहास आणि त्यांचा संघर्ष याबद्दल जागृती करणे गरजेचे झाले आहे. भारतीय संस्कृतीत निसर्गाला ईश्वर मानले जाते. ही आपली संस्कृती आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा आदर राखून त्या आधारे उपजीविका करणारा आदिवासी समाज हा शहरी आणि ग्रामीण भागापासून पूर्णपणे वेगळा आहे. सन १८७५ ते १९०० या दरम्यानच्या आपल्या आयुष्य काळात बिरसा मुंडा यांनी  आपल्या भाल्याने आणि धनुष्य बाणाने लढा दिला होता आणि हाच इतिहास सदोदित प्रेरणादायी ठरेल. या लढ्यामुळे बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे भगवान बनले.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रा. यशपाल खेडकर यांनी केले. 
         स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली  स्वेरीत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर स्वेरीचे प्रा.यशपाल खेडकर हे प्रकाश टाकत होते. दिप प्रज्वलनानंतर प्रा.यशपाल खेडकर यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकून संपूर्ण इतिहास उभा केला जो आजपर्यंत पडद्यामागे होता. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या अल्पवयात केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.’ असे सांगितले. प्रा. खेडकर पुढे म्हणाले की, ‘निसर्गाचे संरक्षण करायचे या भावनेने आदिवासी सवंगडी एकत्र करून जंगल हे आपल्या मालकीचे आहे असे बिरसा मुंडा यांनी एकेका घटकाला सांगितले. याकाळात ब्रिटीशांच्या विरोधात लढा देखील दिला. बिरसा मुंडा यांच्या तीव्र लढ्यामुळे ब्रिटीश काही काळ जंगलापासून दूर गेले पण एके दिवशी बिरसा मुंडा हे काही सवंगड्या बरोबर चर्चा करत असताना ब्रिटिशांनी त्यांच्यावर धाड टाकली, कैद केले आणि जेल मध्ये त्यांचा अंत झाला. अखेर २५ वर्षांचे क्रांतिकारी बिरसा मुंडा हुतात्मा झाले. बिरसाचे सन १८८६ ते १८९० या काळात चैबासा येथे वास्तव्य होते. हा कालावधी जर्मन आणि रोमन कॅथोलिक ख्रिश्चन आंदोलनासाठी ओळखला जातो. त्यामुळे सुगन मुंडा यांनी शाळेतून आपल्या मुलाचे-बिरसाचे नाव काढून घेतले होते. चैबासा हे तत्कालीन सरदारांच्या राज्याच्या राजधान्यांपासून फार दूर नव्हते. सरदारांच्या आंदोलनात इंग्रज शिपायांनी बिरसाला पकडले त्यांच्यावर धर्मविरोधी आणि सरकारविरोधी शिक्का मारला गेला.’ असा संपूर्ण इतिहास सांगितला. यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. मनोज सोनवलकर, निर्भया पथकाचे प्रमुख प्रशांत भागवत, पो.ना.प्रसाद आवटे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ,  विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्यासह स्वेरीचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. वैशाली मुसलंबे व प्रांजली उत्पात यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
 छायाचित्र- स्वेरीत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे, स.पो.नि. मनोज सोनवलकर, निर्भया पथकाचे प्रमुख प्रशांत भागवत, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, विद्यार्थी, इतर.सोबत मार्गदर्शन करताना प्रा यशपाल खेडकर.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here