पाण्याच्या हौदात विष टाकल्याप्रकरणी त्या फरारी पोलिस पाटीलाला पोलिसांनी ठोकल्या बेडया (आराेपीस एक दिवसाची पोलिस कोठडी)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

डिकसळ येथील पाणी पुरवठा करणार्‍या हौदामध्ये विषारी औषध टाकल्याप्रकरणी गावचा पोलिस पाटील तथा आरोपी तुकाराम भैरू कांबळे याला पोलिसांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची हकिकत अशी,जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणी पुरवठा करण्यासाठी 8 हजार लिटर क्षमतेची टाकी असून या टाकीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात आहे.दि.3 जुलै रोजी सकाळी 9.00 वा. पाणी शुध्दीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई विशाल मागाडे हा तेथे गेल्यावर पाण्याची दुर्गंधी आल्याने संशय निर्माण झाला. याबाबत चौकशी केली असता हौदाच्या काही अंतरावर जनावराचे गोचीड मारण्याची औषधाची रिकामी बाटली पडल्याचे निदर्शनास आले. तसेच टाकीच्या पृष्ठभागावर औषधाचे डागही दिसून येत होते.दरम्यान याची फिर्याद ग्रामसेवक राहुल कांबळे यांनी दिल्यावर अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.घटनेनंतर गावचा पोलिस पाटील तथा आरोपी तुकाराम कांबळे हा मोबाईल बंद करून फरार झाल्याने शंका कुशंका निर्माण होवून चर्चेला उधाण आले होते. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी गावाला भेट देवून याबाबतची सखोल माहिती जाणून घेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार सहाय्यक फौजदार सलीम शेख व पोलिस नाईक सुरज देशमुख यांनी मोबाईल लोकेशनवरून त्याचा थांगपत्ता काढून कवठेमहांकाळ जि.सांगली येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.कवठेमहांकाळ येथे तो एका टेलरकडे काम करीत असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले असून त्याने विष टाकल्याची कबुली दिली असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. हे औषध मरवडे येथील एका दुकानातून खरेदी केल्याने पोलिसांनी तेथे जावून त्याची शहनिशा केली. तसेच तेथील फुटेज मिळवून पाहिले असता तो त्यामध्ये दिसून आल्याने त्यानेच विष टाकले असल्याचा अंदाज बांधून त्या दिशेने तपास सुरु केला. औषध टाकण्याची घटना का केली याबाबत पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे सांगण्यात आले.
घटना घडल्यानंतरही आरोपीचा शोध लागत नसल्याने गावभेट दौर्‍यात डिकसळ ग्रामस्थांनी याबाबत आमदार समाधान आवताडे यांच्याकडे गार्‍हाणे मांडून आंदोलन करण्याचा इशारा देताच पोलिस खाते वेगाने कामाला लागून तात्काळ आरोपीला शोधून काढले. काही ग्रामस्थांनी विषारी पाणी पिल्याने त्यांना भविष्यात धोका होवू नये या दृष्टीने आरोग्य विभागाने तात्काळ त्यांचेवर उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला तसेच पोलिस प्रशासनाने ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून संपूर्ण गावाला ते पाणी पिवू नये असे आवाहन केले होते.
दरम्यान,गावच्या पोलिस पाटलावर गावातील कायदा व सुव्यवस्थेची नैतिक जबाबदारी असताना त्याने विष कुठल्या उद्देशाने टाकले या मागचे गुपित उघड करणे पोलिसांना एक आव्हान आहे.सध्या तो या मुद्दयावर काहीच बोलत नसल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here