“चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा इतिहास”या ग्रंथाच्या निर्मितीचा इतिहास

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

कर्जत:- ” इतिहासाचे लेखन करण्यापूर्वी भुतकाळाच्या आधाराने वर्तमानकाळात भविष्यकाळाची इमारत आपल्याला उभी करायची आहे ” हे ध्येय समोर ठेऊन प्र. ल. मोकाशी (प्रभाकर लक्ष्मण मोकाशी ) यांनी लेखनास सुरुवात केली . गेल्या दोन हजार वर्षाचा इतिहास पाहून मगच चां.कां. प्रभुंचा इतिहास लिहावा आणि त्यातून जे ज्ञात होईल तेच अनेक बुध्दिजीवी कायस्थ मानतील असा सल्ला पद्मश्री माधवराव गडकरी यांनी प्र. ल.मोकाशी यांना दिला.तसे हे काम आव्हानात्मक होते. त्यासाठी खुप वर्ष मेहनत घ्यावी लागेल, खुप पुरावे गोळा करावे लागतील, त्यासाठी खुप फिरावे लागेल, प्रवास करावा लागेल व सर्वात महत्वाचे म्हणजे खुप खर्च करावा लागेल याची माहिती असूनही १९८० साली निवृत्त झालेले असिस्टंट पोलिस कमिशनर प्र. ल. मोकाशी यांनी १९८५ साली या कामास प्रारंभ केला.ह्या कामासाठी त्यांनी जवळ जवळ २२६ मराठी व ८० इंग्रजी ग्रंथ वाचले . त्यावेळेस काही ज्ञाती संस्थांतर्फे नियतकालीके प्रसिध्द होत असत .समाजसेवा, कायस्थ समाचार,कायस्थ प्रबोधन,उत्कर्ष,कायस्थ मित्र,कायस्थ चैतन्य या अंकांच्या हजारो प्रति जमवल्या. त्यांचे वाचन करून महत्वाची माहिती संकलित केली . संपूर्ण भारतभर फिरून ज्ञातीतील तज्ञ व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. सहा वर्ष मेहनत घेऊन हस्तलिखित तयार केले मान्यवरांकडून तपासून घेतले व ग्रंथ प्रकाशित करण्यास हरकत नाही अशी मान्यता मिळाल्या नंतर अ. भा. चां.का .प्रभू मध्यवर्ती संस्थेकडे प्रिंटिंग साठी दिले .परंतु त्यांनी खर्चाचा अंदाज घेतल्या नंतर निधी नाही असे मोकाशी यांना सांगितले. सहा वर्ष घेतलेली मेहनत फुकट जाईल म्हणून मोकाशी यांनी देणग्या, ठेवी जमा करण्यास सुरवात केली परंतु पुरेसा निधी न जमल्यामुळे त्यांनी उर्वरित खर्च स्वतः कडचे पैसे देऊन ८६० पानी आकर्षक ग्रंथाच्या एक हजार प्रति प्रिंट केल्या. ह्या ८६० पानी ग्रंथात चाळीस प्रकरणे आहेत .त्यांपैकी अंदाजे पंधरा प्रकरणे (दोनशे पाने ) जुन्या ग्रंथांच्या आधारावर आहेत.उर्वरित प्रकरणात मध्यवर्ती संस्थेची माहिती, परिषदांचा इतिहास, प्रकाशातील व्यक्ती, कलाकार, साहित्यिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर, विवाहमहर्षी ,शिक्षण महर्षी ज्योतिषाचार्य यांची माहिती तर दिली आहेच परंतु आडनावाप्रमाणे गोत्र, प्रवरे, कुलदैवत , मूळगाव ,मूळ पुरुष इत्यादी बहुमोल माहिती दिली आहे .ह्या अंकात मान्यवरांचे तसेच देवदेवतांचे रंगीत फोटो आहेत . ह्या अंकाची किंमत सातशे पन्नास रुपये आहे.५ डिसेंबर १९९२ रोजी ह्या ग्रंथाचे प्रकाशन झाले .त्यादिवशी फारच थोडे ग्रंथ विकले गेले काही ग्रंथ मान्यवरांना भेट देण्यात आले तरी ९५० अंक शिल्लक राहिले . त्याची विक्री करणे म्हणजे मोठे आव्हान होते.त्यातच प्र. ल. मोकाशी यांचे १४ फेब्रुवारी १९९३ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले . त्यामुळे ग्रंथ विक्रीची जबाबदारी कुटुंबीयांवर पडली . २८ वर्षानंतर हे सर्व अंक विकले गेले.हा अंक वाचला तर आपल्या लक्षात येईल की मोकाशी यांनी शेकडो संस्था तसेच कमीतकमी एक हजार व्यक्तींची फोटोसह माहिती प्रसिध्द केली आहे परंतु स्वतःचा फोटो अथवा चार ओळी माहिती त्यात दिली नाही .यावरून ते किती प्रसिध्दी पराड्मुख होते हे लक्षात येईल . त्यांनी ह्या ग्रंथ निर्मितीसाठी तन, मन, धन अर्पण केले आणि सात वर्षात किती शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला ते फक्त त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना माहीत आहे.हा ग्रंथ निर्मितीचा अट्टहास मोकाशी यांनी स्वतःहून घेतला नव्हता तर सी. के. पी. मध्यवर्ती संस्थेने १९७५ साली याबाबत विचार करून एक समिती स्थापन केली होती .त्या समितीत सुरवातीला मोकाशी यांचा समावेश नव्हता . दहा वर्षात समितीच्या अनेक बैठका झाल्या परंतु माहिती गोळा करण्यासाठी करावा लागणारा प्रवास खर्च, मेहनत याचा विचार करून काम पुढे जात नव्हते .काही सदस्यांचे निधन झाल्यामुळे प्र. ल. मोकाशी यांचा ह्या समितीत समावेश करण्यात आला .त्यांनी जे येतील त्यांच्यासह आणि येणार नाहीत त्यांच्या शिवाय हे काम करायचे ठरवले . माहिती गोळा करण्यापासून ते ग्रंथ निर्मिती पर्यंत त्यांनी जी मेहनत घेतली त्याची नोंद होणे आवश्यक आहे. ८६० पानी ग्रंथाची सध्या निर्मिती करायची ठरवले तर ते खुप खर्चिक ठरेल आणि विक्री सुध्दा होणार नाही .परंतु कोणी डिजिटल स्वरूपात ग्रंथ निर्मिती करायचे ठरवले तर त्यांनी प्र. ल. मोकाशी यांनी ग्रंथ निर्मिती साठी घेतलेली मेहनत केलेला खर्च याचा विचार करून मोकाशी कुटुंबीयांशी चर्चा करावी व डिजिटल ग्रंथात प्र. ल. मोकाशी यांच्या रंगीत फोटोसह माहिती द्यावी तरच भावी पिढीला मोकाशी यांच्या बद्दल माहिती व त्यांच्या कार्याची महती समजू शकेल .मोकाशी यांचा जन्म १७ मार्च १९२२ रोजी झाला . सध्या प्र. ल. मोकाशी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे .१७ मार्च २०२२ पर्यंत कोणती संस्था अथवा व्यक्ती यांनी याबाबत पुढाकार घेतला तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल .
दिलीप प्रभाकर गडकरी.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here