महाआवास च्या लाभार्थ्यांना कृतीसंगम च्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे- मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाआवास च्या लाभार्थ्यांना कृतीसंगम च्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे- मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

 

 प्रत्येक पंचायत समिती स्तरावर 9 डिसेंबर रोजी कृतीसंगम मेळाव्याचे आयोजन

 महाआवास अंतर्गत 10 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

 महाआवास अंतर्गत स्थळ पाहणीची कामे 10 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावीत

 

सोलापूर, दि.7 :- जिल्ह्यात महाआवास ग्रामीण अभियान-2 अंतर्गत विविध लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत. या लाभार्थ्यांना पंचायत समिती स्तरावरील 9 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या कृतीसंगम मेळाव्याच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी सर्व तालुकास्तरावरील यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित महा वास अभियान ग्रामीण 2 आढावा बैठकीत श्री स्वामी बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकासाचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यु. जे. कुलकर्णी, राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(बालविकास) जावेद शेख, स्मिता पाटील तसेच सर्व गटविकास अधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी पुढे म्हणाले की, प्रत्येक पंचायत समिती स्तरावर 9 डिसेंबर रोजी कृती संगम मेळाव्याचे आयोजन करून या मेळाव्यात उज्वला अंतर्गत द्यावयाचा लाभाचा अर्ज, स्वच्छ भारत मिशन, जनजीवन मिशन, रोहयो, शिधापत्रिका आदी योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्याच्या विभागाचे स्टोल लावावेत व संबंधित लाभार्थ्यांकडून परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज भरून घ्यावेत व ते अर्ज त्याच ठिकाणी मंजूर झाल्याबाबत लाभार्थ्यांना कळविण्यात यावे. तसेच या अंतर्गत 10 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेस प्रत्येक पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी

तसेच घरकुल योजना अंतर्गत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित राहावे, असेही त्यांनी सूचित केले.

कृती संगम मेळावा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत असून या उपक्रम अंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे व हा उपक्रम राज्यस्तरावर पथदर्शक प्रकल्प म्हणून राबवला गेला पाहिजे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ एकाच दिवशी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. स्वामी यांनी केले. तसेच प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीमध्ये माझी वसुंधरा अभियान व आजदी का महोत्सव या उपक्रमासाठी एक वार रूम तयार करून त्या ठिकाणी काही कर्मचारी नियुक्त करावेत व या ठिकाणाहून वसुंधरा अभियाना बाबत प्रबोधन करावे, असे ही त्यांनी सूचित केले.

महा आवास अभियानांतर्गत बहुतांश तालुक्याची कामे असमाधानकारक आहेत. तरी 10 डिसेंबर 2021 पर्यंत सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणीचे अहवाल पूर्ण करून घरकुलाची कामे सुरू करावीत ज्या तालुक्याचे कामे सुरू होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी दिले. तसेच कृती संगम व जिल्हास्तरीय कार्यशाळेबाबत गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेचे प्रमुख यांनी करावयाच्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली.

महा आवास अंतर्गत अंगणवाडी चे सुपरवायझर यांनी तात्काळ स्थळ पाहणीचे कामे सुरू करावीत. त्याबाबतचे जिल्हा स्तरावरून आदेश आजच निर्गमित करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी दिली. तसेच जे सुपरवायझर हे कामे करणार नाहीत त्यांची नावे तात्काळ संबंधित गट विकास अधिकारी यांनी कळवावीत, असेही त्यांनी निर्देशित केले. यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय पाटील व सहाय्यक पुरवठा अधिकारी साळुंखे यांनी त्यांच्या विभागा मार्फत कृती संगम मेळाव्यात लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाची माहिती दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here