शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी मजीप्राला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय होणार
पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक
सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालवावी यासाठी उद्या महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार ४ सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची शिरभावीसह ८२ शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सन २०३० सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहीत धरून दररोज २२ एमएलडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेली ५३४ किमीची ९९ कोटी २ लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली. शिरभावी योजना कार्यान्वित करताना ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पुढील १५ वर्षे चालवावी असा ठराव २५ मे २००५ रोजी झाला होता. २० मार्च २०२० रोजी १५ वर्षांची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण करून घ्यावी असे पत्र मजीप्राने जिल्हा परिषदेला पाठवले होते.
त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. तसेच या योजनेच्या नुतनीकरणासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून केला असून सदर योजनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे. सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून कायमस्वरूपी चालविण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार ४ सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव, जलजीवन मिशनचे मिशन संचालक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत.