*विठ्ठलराव शिंदेच्या दोन्ही युनिट्स मधून येत्या हंगामात 26 लाख मेट्रिक टन उस गाळप करण्याचे उद्दिष्ट:-रणजीतसिंह शिंदे*
*(कारखान्याच्या मील रोलरचे पुजन संपन्न)*-
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., या कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करंकब या कारखान्याचे पुढील ऊस गाळप हंगाम 2026-27 ची पुर्वतयारी सुरू असून या कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील मील रोलरचे पुजन जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा मार्गदर्शक संचालक रणजितसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते व युनिट नं.2 करकंब येथील मील रोलरचे व्हाईस चेअरमन पोपट गायकवाड यांच्या शुभहस्ते दि.19 जून रोजी कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाले.कार्यक्रमाचे सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते कै.मा.आ.विठ्ठलभाऊ शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी रणजितसिंह शिंदे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू असून प्रत्येक हंगामामध्ये यशस्वी गाळप होत आहे. ऊस गाळप हंगाम 2026-27 साठी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथे 20 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ निश्चित केले असून आजअखेर 33 हजार हेक्टरची ऊस नोंद झालेली आहे. तसेच युनिट नं.2 करकंब येथे आजअखेर 8 हजार 548 हेक्टरची ऊस नोंद झालेली असून 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे, दोन्ही युनिटचे मिळून 26 लाख मे.टन गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे .
पुढे बोलताना रंगीत शिंदे म्हणाले की साखर कारखानदारीपुढे नवीन आव्हाने उभी ठाकलेली आहेत. यापुर्वी साखर कारखाने 6 ते 7 महिने चालत होते, परंतु मागील 3 ते 4 वर्षापासून साखर कारखान्याचे गाळप 4 महिन्यांवर येवून ठेपले आहे. या बदलाचा साखर कारखान्यांवर फार मोठा परिणाम दिसून येत आहे. हा बदल विचारात घेवून आपल्याला देखील यापुढे काटकसरीने कारभार करून मेन्टेनन्स खर्च कमी करण्यावर भर देणे आवश्यक आहे. काळानुसार बदल करावा लागणार असून हा बदल लागलीच घडून येणार नसून हा बदल करणेच्या दृष्टीने दरवर्षी ठोस पावले उचलावी लागणार आहेत. या बरोबरच शेतक-यांचे प्रती एकर ऊस उत्पादन वाढीवर भर देणे आवश्यक आहे. सभासद शेतकऱ्यांच्या ऊस पिकावर देखरेख ठेवण्यासाठी व अचुक मार्गदर्शन कऱण्याच्या उद्देशाने कारखान्याने अंदाजे 20 हजार एकर क्षेत्रावर अत्याधुनिक “ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ” (ए आय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे शेतक-यांना अचूक मार्गदर्शन मिळून ऊस उत्पादनात वाढ होणार आहे. त्याबरोबरच कामगारांची सुरक्षितता देखील महत्वाची असून काम करताना अपघात होवू नये यासाठी विभागवार प्रशिक्षण देण्याच्या त्यादृष्टीने कारखाना ठोस पावले उचलणार आहे असेही त्यांनी सांगितले.
ऊस गाळप हंगाम 2026-27 मध्ये दोन्ही युनिटकडे गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होण्याचे दृष्टीने आवश्यक ऊस तोडणी वाहतूकीचे करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच करार करणेत आलेल्या ट्रक/ट्रॅक्टर्स, बैलगाडी व ट्रॅक्टर टायरगाडीचे यंत्रणेस कारखाना धोरणा प्रमाणे लवकरच पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा केला जाणार आहे. ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व मुकादम यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क करून करार करावेत. आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफ सिझन मधील कामे प्रगतीपथावर असून दोन्ही युनिटकडील सर्व कामे वेळेत पूर्ण करून गाळप हंगाम 2026-27 शासनाचे धोरणानुसार वेळेत सुरू करणार आहे. तसेच पुढील हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी कारखान्याकडे देवून हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
या कार्यक्रमास संचालक रमेश येवलेपाटील, लाला मोरे, अशोक मिस्कीन, पांडूरंग घाडगे, पंडीतराव पाटील, राजेश खोत, संजय लोकरे, विलास कौलगे,राजाराम नाळे,राजाराम थोरात,जितेंद्र गायकवाड,श्रीकांत पाटील, सचिन देशमुख, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, युनिट 2 चे जनरल मॅनेजर पी.एस.येलपले, केन मॅनेजर एस.पी.थिटे,चिफ इंजिनिअर एस.डी.कैचे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल,चिफ केमिस्ट ए.के.जगताप, हेड टाईम किपर आर.एन.आतार, युनिट 2 चे चिफ इंजिनिअर एस.एस.महामुनी, चिफ केमिस्ट बी.जे साळुंखे, मुख्य शेतकी अधिकारी आर.जे.पाटील, असि. परचेस ऑफिसर एस.व्ही चौगुले, हेड टाईम किपर टी.ए.लोंढे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर ,प्रशासन प्रमुख शशिकांत पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

