दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा २ कोटींचा मदतीचा हात!
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द; सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी दर्शन!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना या संकटाच्या काळात आर्थिक मदतीचा आधार मिळावा, या उदात्त हेतूने मंदिर समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंढरीच्या विठुरायाच्या चरणी अर्पण होणाऱ्या भक्तीभावाला सामाजिक सेवेची जोड देत मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा, प्रथम नागरिक तथा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या डॉ. सौ. प्रणिताताई भगीरथ भालके, मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच मंदिर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केलेल्या या दोन कोटी रुपयांच्या मदतीमुळे संकटग्रस्त शेतकरी बांधवांना मोठा आधार मिळणार आहे.
