*भीमा’वर रक्तदान शिबिरातून कै.पैलवान भिमराव (दादा) महाडिक यांना आदरांजली*.
सामाजिक उपक्रमांनी कै. भिमराव महाडिक यांची पुण्यतिथी साजरी..
पै. भिमराव महाडिक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी
भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. पैलवान भीमराव (दादा) महाडिक यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दादांच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या भव्य रक्तदान शिबिरात ११३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत दादांच्या समाजसेवेचा वारसा जपला. तसेच पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने ह. भ. प. किरण बोधले महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांनी आपल्या कीर्तनातून कै. भीमराव (दादा) महाडिक यांच्या जीवनकार्याचा आणि त्यागाचा गौरव केला. दादांनी सहकारातून परिसरातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कामाची महती सांगत, समाजसेवेचे महत्व विषद केले. महाराजांच्या कीर्तनाने उपस्थित श्रोते भारावून गेले होते.
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते,रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. एकूण ११३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे.
या कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, तसेच पंचक्रोशीतील शेतकरी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कै. पैलवान भीमराव (दादा) महाडिक यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. सामाजिक कार्यातून त्यांना वाहिलेली ही आदरांजली चिरकाल स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
