म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील बंधारे, तलाव भरण्यात येणार:- आ.शहाजीबापू पाटील
(गळवेवाडी ते वाढेगाव पर्यंतचे १५ बंधारे तसेच नराळे, घेरडी, हंगीरगे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार)
कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले आहे. आठ दिवसांत म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडी पासून वाढेगाव पर्यंतचे १५ बंधारे तसेच नराळे, घेरडी व हंगीरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरुन देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. यामुळे गळवेवाडी, सोनंद, आगलावेवाडी, जवळा, कडलास, बुरुंगेवाडी, आलेगाव, मेडशिंगी व वाढेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे.
कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे. दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे. या योजनेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे जत, सांगोला भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले असून जसजशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व वंचित गावांतील पाझर तलाव, गाव तलाव व इतर पाणीसाठे भरुन देण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून गळवेवाडी पासून वाढेगाव पर्यंतचे १५ बंधारे तसेच नराळे, घेरडी व हंगीरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरुन देण्यात येणार असल्याने गळवेवाडी, सोनंद, आगलावेवाडी, जवळा, कडलास, बुरुंगेवाडी, आलेगाव, मेडशिंगी व वाढेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.