एवढ्या मोठ्या सोलापूर झेडपीची खुराड्यात सभा! अनेकांची झाली कुचंबणा!
(जेवणाबाबतही सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी केली प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त)
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आगामी आषाढी वारीचे नियोजन जोरदार सुरू आहे. यंदाची वारी सुद्धा हायटेक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे प्रयत्न करत आहेत.
आषाढी वारीची पाहणी आणि एकूणच या आषाढी वारीचे स्पेशल जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेसाठी स्थळ हे गोपाळपूर जवळील स्वेरी कॉलेज ठेवण्यात आले.
रस्त्याने जाताना कॉलेजचा भव्य दिव्य परिसर पाहायला मिळतो. आत मध्ये सुद्धा तितकेच मोठे कॉलेज आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती ही सभा मोठ्या अशा हॉलमध्ये होईल पण अनेकांची निराशा झाली केवळ शंभर लोक बसतील एवढाच आणि आकाराने छोटा हॉल या सभेसाठी निवडण्यात आला होता.
त्यामुळे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा प्रचंड कुचंबणा झाली. या हॉलमध्ये माध्यम प्रतिनिधींना नीट फोटो काढता येत नव्हता ना शूटिंग घेता येत होते. जिल्हा परिषद अधिकारी यांनी सदस्यांना सुद्धा दाटून बसावे लागले. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वांसाठी ठेवण्यात आलेल्या जेवणाबाबत सुद्धा प्रचंड नाराजीचा सूर उमटला. अनेकांनी बाहेर या बैठक व्यवस्थेबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. कोंबडीच्या खुराड्यात आणून बसवले असे शब्द काही सदस्यांच्या तोंडून बाहेर आले.
