
अजितदादांच्या निकटवर्तीयाच्या गळ्यात पडली सोलापूर जिल्हाध्यपदाची माळ!
उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल सात महिन्यांनंतर नवा कॅप्टन मिळाला आहे.
मात्र, उमेश पाटील यांच्या नियुक्तीने सोलापूरच्या राष्ट्रवादीमध्ये वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा, तसे पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. जिल्हाध्यक्षपदासाठी उमेश पाटील यांच्यासोबतच अनेक नावे चर्चेत होती. अनेकांनी जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा बोलून दाखवली होती. अनेकांची इच्छा असूनही अजितदादांनी थेट नकार दिल्याने त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांच्या खांद्यावर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही. पक्षाचा आमदार नसला तरी सोलापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती. त्यात जिल्हा परिषदेपासून बहुतांश पंचायत समित्यांवरही पक्षाचा झेंडा होता. मात्र, मागील निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऐवजी जनतेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देणे पसंत केले होते, त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत सोलापुरात एकही जागा मिळू शकलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचे मोठे आव्हान उमेश पाटील यांच्यापुढे असणार आहे.
ती टीका आणि पाटलांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्री आली होती. त्या जनसन्मान यात्रेच्या सभेत तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी उमेश पाटील यांची भरसभेत तक्रार केली हेाती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी नाव न घेता उमेश पाटील यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली होती.
मानेंचा पराभव करण्यात मोठे योगदान
त्या टीकेमुळे उमेश पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडत विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काम केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तत्कालीन आमदार यशवंत माने यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येताच उमेश पाटील यांनी फेब्रुवारीमध्ये पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत उमेश पाटील यांच्या खांद्यावर थेट जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे.