*मल्लखांब विश्वगुरू पद्मश्री उदय देशपांडे यांची श्रीकृष्ण गुरुकुलला सदिच्छा भेट; मल्लखांब क्रीडा प्रकाराचे उद्घाटन!*
*(श्रीकृष्ण गुरूकुल शिक्षण समुहाचे, अध्यक्ष श्री प्रमोद आवताडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
मल्लखांब या भारतीय पारंपरिक क्रीडा प्रकाराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे मल्लखांब विश्वगुरू, पद्मश्री पुरस्कारप्राप्त उदय देशपांडे यांनी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण गुरुकुल, वाघोलीवाडी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते गुरुकुलमध्ये मल्लखांब खेळाच्या खांबाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रमोद आवताडे होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. मुख्याध्यापक प्रा. किशोर शिनगारे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ बतगुणगी हनुमंत अवताडे व अजय लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पद्मश्री उदय देशपांडे म्हणाले की, मल्लखांब हा केवळ खेळ नसून शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढविणारे प्रभावी माध्यम आहे. मल्लखांबामुळे मनातील भीती दूर होऊन धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण होतो. दोरीवरील मल्लखांब आणि लाकडी मल्लखांब असे त्याचे प्रमुख प्रकार असून लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हा खेळ उपयुक्त आहे.
मल्लखांबामुळे शरीराची लवचिकता, ताकद, पचनसंस्था, रक्ताभिसरण व श्वसनसंस्था यांचा विकास होण्यास मदत होते. जीवनात कितीही पैसा कमावला तरी शरीर निरोगी नसेल तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार आणि चांगल्या आचार-विचारांची सवय लावून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
जर्मनीमध्ये वास्तव्यास असताना स्वतः जर्मन भाषा शिकण्यासोबतच मल्लखांबाचे प्रशिक्षण देण्याचा अनुभव, तसेच अंधशाळेतील विद्यार्थ्यांना मल्लखांबाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केल्याचे प्रेरणादायी अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. वयाच्या ८९ व्या वर्षीही एका व्यक्तीने मल्लखांब शिकल्याचे उदाहरण देत मल्लखांबासाठी वयाची मर्यादा नसून मनात जिद्द आणि चिकाटी असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र ही मल्लखांबाची जन्मभूमी असून आज हा खेळ अनेक देशांमध्ये पोहोचला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. मल्लखांबाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी मल्लखांबाची आरतीदेखील तयार केली आहे.
**अध्यक्षीय मनोगतात प्रमोद आवताडे म्हणाले की, पद्मश्री उदय देशपांडे सरांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आज श्रीकृष्ण गुरुकुलमध्ये मल्लखांब खेळाचे उद्घाटन झाले असून विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांनी या पारंपरिक भारतीय खेळात प्रावीण्य मिळवावे, निरोगी राहावे आणि शरीर सुदृढ बनवावे. भारतीय पारंपरिक खेळांचा अभिमान बाळगून त्यांचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश देताना, “विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक असावे, मनात जिद्द असावी, विचारांमध्ये सकारात्मकता असावी आणि शरीरामध्ये खेळाडूची ऊर्जा असावी,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास श्रीकृष्ण गुरुकुलचे मुख्याध्यापक किशोर शिनगारे सर, श्री राधा गुरुकुल चे मुख्याध्यापक सुनिल गरड सर, एम बी चव्हाण गुरुकुल चे मुख्याध्यापक प्रतीक जगदाळे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल शिंदे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सारिका खटके यांनी केले.
