पंढरपूरच्या स्वच्छतेला मिळणार नवी गती! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून नगर परिषदेला अत्याधुनिक यांत्रिक सफाई मशीन!
(नगराध्यक्ष डॉ. प्रणिता ताई भगीरथ भालके यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तत्काळ सकारात्मक प्रतिसाद; मशीनचे लोकार्पण संपन्न!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर नगरीच्या स्वच्छतेला आता अधिक गती मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून पंढरपूर नगर परिषदेला अत्याधुनिक यांत्रिक रस्ते सफाई मशीन (Mechanized Sweeping Machine) उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशीनचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
पंढरपूर येथे वर्षभरात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार प्रमुख यात्रा भरतात. यामध्ये आषाढी वारी हा सर्वात मोठा धार्मिक सोहळा असून या कालावधीत राज्यासह देशभरातून सुमारे ३० लाखांहून अधिक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होतात. भाविकांची वाढती संख्या, शहरातील विस्तारणारे नागरीकरण आणि यात्राकाळातील प्रचंड गर्दी लक्षात घेता शहरातील रस्ते, बाजारपेठा, प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणांची नियमित स्वच्छता राखणे हे नगर परिषदेसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
सध्या पंढरपूर नगर परिषदेकडे रस्ते स्वच्छतेसाठी केवळ एकच यांत्रिक सफाई मशीन उपलब्ध असल्याने संपूर्ण शहराची दैनंदिन स्वच्छता प्रभावीपणे करणे अडचणीचे ठरत होते. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या स्वच्छतेसाठी आणखी एका आधुनिक मशीनची आवश्यकता होती.
याच पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता ताई भगीरथ भालके यांनी शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नवीन Mechanized Sweeping Machine उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. नगराध्यक्षांच्या या मागणीची उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी तातडीने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पंढरपूर नगर परिषदेला ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली.
या मशीनमुळे शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या परिसराची स्वच्छता अधिक जलद, नियमित व प्रभावीपणे करता येणार आहे. तसेच मनुष्यबळावरील ताण कमी होण्यास मदत होऊन शहरातील धूळ, कचरा आणि अस्वच्छतेवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. विशेषतः आषाढी व कार्तिकी यात्रेच्या काळात लाखो भाविकांना स्वच्छ आणि सुंदर पंढरपूरचा अनुभव देण्यासाठी या मशीनचा मोठा उपयोग होणार आहे.
पंढरपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला साजेसे स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष डॉ. प्रणिता ताई भगीरथ भालके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. नगराध्यक्षांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे नागरिकांमधून आभार व्यक्त होत आहेत.
भाविकांची वाढती संख्या, यात्रेचे नियोजन आणि शहराच्या स्वच्छतेची गरज लक्षात घेता उपलब्ध झालेली ही अत्याधुनिक मशीन पंढरपूरच्या स्वच्छता व्यवस्थेला निश्चितच बळकटी देणारी ठरणार आहे.
