चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानातून २.५ टन कचरा संकलित
(दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता श्रमदान अभियान; सामाजिक संस्था व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषद आणि होडी चालक-मालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या मोहिमेत तब्बल २.५ टन कचरा संकलित करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
चंद्रभागा वाळवंट परिसरात राबविण्यात आलेल्या या अभियानात स्वयंसेवक, नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिकांनी श्रमदान करून प्लास्टिक, कचरा आणि इतर घनकचरा संकलित केला. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
या अभियानात नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
दर बुधवारी स्वच्छता व श्रमदान अभियान
पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आणि इच्छुक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, या अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून नोंदणी करावी.
पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व निर्मळ ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून ‘स्वच्छ पंढरपूर – सुंदर पंढरपूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
