आमदार रोहितदादा पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे रोहित पवार यांना आव्हान!
(अर्धवट बुद्धीने जिल्ह्याच्या विकासाला विरोध न करण्याचा पवारांना सल्ला)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या दारू बनविण्याच्या कारखान्याला लाखो लिटर पाणी घेणे आधी बंद करावे, मग जगाला पाण्याबाबत आणि दुष्काळाबाबत अक्कल शिकवावी, असा टोला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.
ए आय डेटा सेंटरला विरोध करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या विरोधात शनिवारी सोलापूरकरांनी रस्त्यावर उतरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जनसमर्थन आंदोलन केले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. धिक्कार असो धिक्कार असो रोहित पवारांचा धिक्कार असो, सोलापूरकर तरुणांचा रोजगार हिरावून घेऊ इच्छिणाऱ्या रोहित पवारांचा धिक्कार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, रोहित पवारांचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दुमदुमून गेला. या आंदोलनास तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले,
आयुष्यभर सत्ता असूनही सोलापूरच्या विकासासाठी पवारांनी काहीच केले नाही. परंतु काही चांगले प्रकल्प यायला लागले की या प्रकल्पात खोडा घालायला मात्र रोहित पवार पुढे असतात. आपल्या अर्धवट बुद्धीने जिल्ह्यातील नागरिकांना भडकावून जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्याचे पाप रोहित पवारांनी करू नये.
रोहित पवार हे आंदोलनजीवी झाले आहेत. शेतकरी, विद्यार्थ्यांना पुढे करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे आजोबा शरद पवार यांनी प्रकल्प समजावून घेतला आणि विरोध केला नाही. रोहित पवार स्वतःला शरद पवार यांच्यापेक्षा शहाणे समजतात का ? असा घणाघातही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घातला. ए आय डेटा सेंटर प्रकल्पाला अर्धा टीएमसी पाणी लागणार असतानाही नऊ टीएमसी पाणी लागणार आहे, असे आमदार रोहित पवार यांच्याकडून सांगितले जात आहे. या ठिकाणी अणु प्रकल्प होणार असल्याचेही ते खोटे सांगत आहेत. विकास प्रकल्पात मिठाचा खडा टाकण्याचे पाप रोहित पवारांनी करू नये, असेही आमदार सचिन कल्याणशेट्टी याप्रसंगी म्हणाले.
सोलापूरची जनता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे. असे १०० रोहित पवार आले तरी ए आय डेटा सेंटर सारखे विकास प्रकल्प थांबणार नाहीत. रोहित पवारांनी विकास प्रकल्पांना विरोध करणे सुरू ठेवले तर यापेक्षा दसपट मोठे आंदोलन आम्ही उभे करू, असे आव्हानही आमदार सचिन कल्याणशेट्टी याप्रसंगी आमदार रोहित पवार यांना दिले.
=======
*पोस्टल मतांवर निवडून आलात*
*आमदार रोहित पवार हे केवळ अकराशे मतांनी तेही पोस्टल मतांवर निवडून आले असले तरी आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्री, मुख्यमंत्री, अधिकारी यांना भेटून प्रकल्पाची माहिती घ्यावी, असा चिमटाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार रोहित पवार यांना काढला*
