*म्हैसाळचे पाणी मंगळवेढ्याच्या शेवटच्या गावांपर्यंत पोहोचवा*
*(४ साठवण तलाव बंदिस्त पाइपलाइनद्वारे भरण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी; कृष्णा-भीमा नदीजोडीतून ६ टीएमसी पाण्याचीही मागणी!)*
*म्हैसाळचे पाणी मंगळवेढ्याच्या शेवटच्या गावांपर्यंत पोहोचवा*
*(४ साठवण तलाव बंदिस्त पाइपलाइनद्वारे भरण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी; कृष्णा-भीमा नदीजोडीतून ६ टीएमसी पाण्याचीही मागणी!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांना पुरेशा दाबाने व नियमित पाणी मिळावे, यासाठी शिरनांदगी, पडोळकरवाडी, सारोळी व लवंगी येथील साठवण तलाव मुख्य कालव्यावरून थेट बंदिस्त पाइपलाइनद्वारे भरून देण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (५ ऑक्टोबर) मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध सिंचन योजनांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस जलसंपदा सचिव एकनाथ डवले, अलका अहिरराव, मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्यासह जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रलंबित कामांचे सूक्ष्म नियोजन करून ती कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. कालव्यांची गळती रोखणे, बंधारे भरून घेणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणाच्या शेवटच्या टप्प्यातील गावांना अत्यल्प प्रमाणात व कमी दाबाने पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मुख्य कालव्यावरून मंगळवेढा तालुक्यातील गावे तसेच पडोळकरवाडी, लवंगी, मारोळी व शिरनांदगी हे चार मोठे साठवण तलाव बंदिस्त पाइपलाइनद्वारे भरून देण्यासाठी सुधारित प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याची मागणी आवताडे यांनी केली.
म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्रमांक १ व २ तसेच उमदी डीवायवरील मंगळवेढा तालुक्यातील काही गावांना अद्याप अपेक्षित पाणी मिळालेले नाही. या भागातील शेतीबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने पाणी सोडण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्पांतर्गत कृष्णा नदीतील अतिरिक्त वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. या पाण्यापैकी माण नदीच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाला सुमारे ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आवताडे यांनी केली. याबाबत जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले.
आमदार आवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजना फेज १ व २ नाबार्डमध्ये समाविष्ट करून निधी उपलब्ध करावा, फेज ३ ची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी, भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढविण्यास प्रशासकीय मंजुरी द्यावी, डोंगरगाव-खडकी मार्गावरील उजनी कॅनलच्या पुलास प्रशासकीय मान्यता द्यावी, नीरा-भाटघर कालव्यावरील नादुरुस्त गेटच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा आणि गुंजेगाव येथे बंधारा बांधावा, अशा मागण्या केल्या. याबाबत झालेल्या बैठकीत लवकरच तोडगा निघणार असल्याचा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.
