è*खा. प्रणितीताई शिंदे यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद!*
*(सोलापूर सह राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रलंबित अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर कृषी यांत्रिकीकरण योजना तसेच ठिबक सिंचन योजनेंतर्गत प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
खासदार प्रणितीताई शिंदे यांनी ३१ जुलै २०२६ रोजी कृषीमंत्र्यांना पत्र देऊन, पूर्वसंमती मिळूनही अनुदान प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी केली होती. पावसाळ्यात हंगामी पिकांची लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन, कृषी अवजारे व यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. मात्र, अनुदान रखडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
दरम्यान, राज्य शासनाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय काढून कृषी समूह योजनेंतर्गत प्रलंबित दायित्वांची पूर्तता करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण आणि मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबरपासून सोलापूर सह राज्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रलंबित अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनुदान रखडल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न खासदार प्रणितीताई शिंदे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून देत त्याच्या तातडीने वितरणाची मागणी केली होती. आता रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामस्थांकडून खासदार प्रणितीताई शिंदे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळणे हा त्यांचा हक्क असून, प्रलंबित अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होणे ही दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यापुढेही पाठपुरावा सुरू राहील, अशी भूमिका खासदार प्रणितीताई शिंदे यांनी व्यक्त केली.
