पंढरपूर भुयारी गटार योजनेसाठी 121 कोटी मंजूर करावेत:माजी आ. प्रशांत परिचारक
पंढरपूर- शहराचा होणारा विस्तार व दैनंदिन येणारे हजारो भाविक यांचा विचार करता पंढरपूरच्या चौथ्या टप्प्यातील भुयारी गटार योजनेसाठी 121 कोटी रुपये मंजूर करावेत अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.
याबाबतचा प्रस्ताव पंढरपूर नगरपरिषदेने तयार करून शासनाकडे पाठविला आहे.
महाराष्ट्रातील राज्यातील पंढरपूर अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र असून श्रीविठ्ठल रूक्मिणीचे दर्शनाकरिता राज्यातील व इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री अशा चार यात्रा कालावधीत येत असतात. तर दररोज 50 हजार भाविक देखील हजेरी लावतात. तसेच पंढरपूर शहर व उपनगर विकसित होत असून वाढती लोकसंख्या पाहता भुयारी गटार क्र.4 करणे गरजेचे आहे.
यापुर्वी पंढरपूर शहारात शासनाने भुयारी गटार योजनेचे तीन टप्पे राबविले असून त्याअनुषंगाने भुयारी गटार योजना टप्पा क्र.4 साठी केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत पंढरपूर भुयारी गटार योजनासाठी 121.69 कोटींचा डीपीआर बनवून प्रस्ताव तांत्रिक मंजूरीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे सादर केलेला आहे.
नव्या भुयारी गटार योजना टप्पा क्र.4 मध्ये टाकळी, गणेश नगर, कासेगाव रोड परिसर, कोर्ट परिसर, इसबावी गावठाण परिसरातील कामे प्रामुख्याने होणार आहेत.
परंतु मागील काही महिन्यांपासून आचारसंहिता असल्यामुळे हा प्रस्ताव रखडला होता. आता भुयारी गटार योजना टप्पा क्र.4 साठी तातडीने राज्य स्तरीय समितीमध्ये मंजूरी द्यावी अशी मागणी मा.आ.प्रशांत परिचारक राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांचेकडे केली आहे.